१३ कोटी थकबाकी वसुलीचे आव्हान ; बिल भरण्यास सूट ही महावितरणची डोकेदुखी..

सिध्देश परशेट्टे
Thursday, 23 July 2020

वीजबिल थकवल्याने ही वसुली करण्याचे आव्हान महावितरणसमोर आहे. 

खेड (रत्नागिरी ) : कोरोना रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून केलेल्या लॉकडाउनमुळे शासनाने ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी सूट दिल्याने वीज ग्राहकांकडून वीज भरणाच झालेला नाही. शहरासह तालुक्‍यातील ९५ हजार ६८१ ग्राहकांनी महावितरणचे १२ कोटी ९३ लाख ६३ हजार रुपयांचे वीजबिल थकवल्याने ही वसुली करण्याचे आव्हान महावितरणसमोर आहे. 

मार्च महिन्यापासून महावितरणने ग्राहकांना वीज देयके देण्याऐवजी वापरानुसार वीजबिल भरण्याबाबत सूचित केले होते; मात्र असंख्य ग्राहकांनी वीजबिल भरणाच केलेला नाही. गेल्या तीन महिन्यांत ग्राहकांनी वीजबिलापोटीची रक्कम न भरल्याने कोट्यवधी रुपयांची थकबाकी राहिली आहे.

हेही वाचा- मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर रात्रीची  वाहतूक सुरूच : खासगी वाहतूकीने चाकरमान्यांची गावाकडे धाव... -

लॉकडाउनच्या कालावधीत ग्राहकांनी वीजबिले भरण्यासाठी असमर्थता दर्शविली. त्यात लॉकडाउनमध्ये आलेल्या शिथिलतेनंतर कोरोनाबाधित क्षेत्र वगळता अन्य भागात वीज मीटरचे रीडिंग घेऊन वीजबिले घेण्यास सुरवात केली होती; मात्र ही वीजबिले वाढीव आल्याचा सूर ग्राहकांकडून आळवण्यात येत आहे. लॉकडाउनमुळे रोजगार बुडाला आहे. आर्थिक चणचण भासत आहे.

हेही वाचा- गुगल अ‍ॅपवर नोंद :  चिपळूण पालिकेचे पथक पोहचले 9 हजार 470 लोकापर्यंत.. -

या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन काळातील वीजबिले माफ करण्याची मागणी होत आहे; मात्र महावितरणकडून वीजबिले भरणा करण्याबाबत सातत्याने सूचना केल्या जात आहेत. वीज देयकांअभावी वीजबिले थेट ऑनलाइन भरण्याबाबतही ग्राहकांना सक्ती केली जात आहे. तालुक्‍यात ९५ हजार ६८१ घरगुती ग्राहकांकडे १२ कोटी ९३ लाख ६३ हजार रुपयांची थकबाकी शिल्लक राहिल्याने ही वसुली करण्यासाठी आत्तापासून आटापिटा करावा लागतोय.

हेही वाचा-दिलासादायक : मंडणगडात ३७ पैकी ३५ कोरोनाबधित पूर्ण बरे ; एकावर उपचार सुरू ; एकाचा मृत्यू -

विविध घटकांकडून झालेला वीज वापर
वाणिज्य वापर करणाऱ्या ५ हजार ८४२ ग्राहकांकडे १ कोटी ९९ लाख ७९ हजार, औद्योगिक ९२७ ग्राहकांकडे १ कोटी ८५ लाख १७ हजार, कृषीच्या २ हजार १९९ ग्राहकांकडे ४६ लाख ८९ हजार रुपये थकीत आहेत. ४७२ पथदीपांचे २ कोटी १० लाख ७२ हजार थकीत असून अन्य ७१ ग्राहकांकडे ४ लाख ३४ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाच्या ६६८ ग्राहकांकडे १ कोटी २७ लाख ७८ हजार, इतर सार्वजनिक सेवांसाठी १ हजार २८१ ग्राहकांकडे ५२ लाख ४८ हजार रुपये थकीत आहेत.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: msedcl discount on bill payment 13 crore arrears recovery challenge in khed ratnagiri district