esakal | सावंतवाडीतील एमटीडीसीच्या कामांची चौकशी करावी : संजू परब
sakal

बोलून बातमी शोधा

sanju parab

सावंतवाडीतील एमटीडीसीच्या कामांची चौकशी करावी : संजू परब

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : शहरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अंतर्गत कामामध्ये आमदार दीपक केसरकर यांच्या आशिर्वादाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही संबंधितावर कारवाई झालेली नाही. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन येथील नगराध्यक्ष संजू परब यांनी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची कामे करण्यात आली आहेत. शिवउद्यानमध्ये खेळणी, हेल्थ फार्ममध्ये एसी व अन्य कामे झाली आहे; मात्र शिवउद्यानात बसविलेली खेळणी ही निकृष्ट दर्जाची आहेत. हेल्थपार्कमधील काम पुर्ण न होताच कामाचे बील संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात आल्याचे नगराध्यक्ष परब यांनी आरोप करतांना स्पष्ट केले होते. याबाबत आमदार केसरकर यांच्यासह अधिकारी याचा हात असल्याचेही परब यांनी सांगत याप्रकरणी कारवाईची मागणी घेऊन त्यांनी पंधरा ऑगस्टला उपोषण छेडले होते. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी याच्यासोबत यासंदर्भात बैठकही पार पडली होती.

हेही वाचा: यंदा जिल्ह्यातील 1800 होमगार्ड गणेशोत्सवावर बहिष्कार टाकणार?

सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या माजी खासदार किरीट सोमय्या यांची भेट घेत त्यांना यासंदर्भात सखोल चौकशी करण्याबाबत निवेदन दिले. त्यामध्ये सावंतवाडी शहरात झालेली महाराष्ट्र पर्यटन महामंडळाची कामे स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी ही कामे मंजूर करून दिली होती. त्यामुळे त्यांचा या भ्रष्टाचारात सहभाग आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करण्यात यावी, यासाठी आपण पंधरा ऑगस्ट उपोषण छेडले तसेच जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचेही लक्ष वेधले होते. त्यांनी याबाबत कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते; पण अद्यापही कोणतीही चौकशी अथवा कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आपण याप्रश्नी लक्ष घालावा, असे परब यांनी निवेदनात म्हटले आहे. या प्रश्नी आपण लक्ष घालू असे आश्वासन सोमय्या यांनी दिले आहे. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावले, बंटी पुरोहित, सत्यवान बांदेकर, हेमंत बांदेकर आदी उपस्थित होते.

loading image
go to top