हिंदुत्ववाद्यांच्या हत्येचा तपास 'या' यंत्रणेकडे देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

हिंदुत्ववादी संघटनांचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या सातत्याने होत असलेल्या हत्या व त्यांना मिळणाऱ्या धमक्‍या यामागील षड्‌यंत्राचा शोध घ्यावा तसेच हिंदुत्ववाद्यांच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिंधुदुर्गनगरी :  हिंदुत्ववादी संघटनांचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या सातत्याने होत असलेल्या हत्या व त्यांना मिळणाऱ्या धमक्‍या यामागील षड्‌यंत्राचा शोध घ्यावा तसेच हिंदुत्ववाद्यांच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

याबाबतचे निवेदन आज निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांना देण्यात आले. यावेळी हिंदू जनजागृती समिती सिंधुदुर्गचे गजानन मुंज, जगन्नाथ केरकर, डॉ. अशोक महिंद्रे, डॉ. सुर्यकांत बालम, सुरेश दाभोलकर आदी उपस्थित होते. 

एका महिन्यात पाच हिंदुत्ववाद्यांच्या हत्या

केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, बंगाल, जम्मू-काश्‍मिर आदी राज्यात होत असलेल्या हिंदू नेत्यांच्या हत्या हा एक व्यापक सुनियोजीत कटाचा भाग आहे. उत्तर प्रदेशात 8 ऑक्‍टोबरला देवबंद येथे भाजप नेते यशपाल चौधरी यांची हत्या, 10 ऑक्‍टोबरला बस्ती येथील भाजप नेता कबीर तिवारी यांची हत्या, 12 ऑक्‍टोबरला सहारणपूर येथील भाजप नगरसेवक धारा सिंह यांची हत्या, 18 ऑक्‍टोबरला हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता मुकेश शर्मा आणि कमलेश तिवारी अशा पाच हिंदुत्ववाद्यांच्या हत्या उत्तर प्रदेशमध्ये केवळ एका महिन्यात होणे हे अतिशय चिंताजनक आहे.

हिंदुत्ववादी नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्‍या ​ 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील महत्वाच्या व्यक्तींवर आंतकवाद्यांनी आक्रमण करण्याचा कट रचणे आणि यासंबंधी काही महत्वाची कागदपत्रे आणि नावाची यादी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या हाती लागणे ही फार गंभीर बाब आहे. काही हिंदुत्ववादी नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्‍या देण्यात येत आहेत. हा सर्व प्रकाश एका व्यापक कटाचा भाग वाटतो. तरी कमलेश तिवारी यांच्यासह हिंदुत्ववाद्यांच्या हत्या करणाऱ्यांना तत्काळ कठोर शासन व्हावे.

निवेदनात  केलेल्या मागण्या

 हिंदुत्ववाद्यांच्या वाढत्या हत्याकांडामागील षड्‌यंत्राचा शोध घ्यावा. या प्रकरणांचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे द्यावा. तपासाची कालमर्यादा निश्‍चित करून पाळेमुळे खणून काढावीत. तसेच ज्या हिंदुत्व निष्ठावर आक्रमण होण्याची शक्‍यता वाटते अशांची सुची बनवून त्या नेत्यांना राज्यात आणि राज्याबाहेर तत्काळ सुरक्षा पुरविण्याचे आदेश केंद्र शासनाने द्यावेत आदी मागण्या निवेदनातून केल्या आहेत.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder Of Hindu Activists Investigating Give To National Agency