मुस्लिम बांधव करणार शासनाच्या या निर्देशाचे पालन ...

मुझफ्फर खान
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

 मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या अनुषंगाने शासनाने काही निर्देश लागू केले आहेत.

चिपळूण (रत्नागिरी) :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रमजान महिन्यामध्ये नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तारीच्या अनुषंगाने  एकत्र न येण्याबाबत शासनाने जे निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे मुस्लिम समाजबांधवांनी पालन करावे असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या मौलवीं व मुस्लिम समाजबाधवांच्या बैठकीत केले. शासनाच्या आदेशाचे पालन करण्याची ग्वाही  मौलवीं व मुस्लिम बांधवांनी दिली. 

कोरोनाने जगात भारत देशात हाहाकार उडवला आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंतेत भर टाकणारी आहे. दरम्यान, शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनसह संचारबंदी लागू केली आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून सामाजिक सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश केले आहेत.

हेही वाचा- केरळातील बनाना चिप्स रत्नागिरीत, तर हापूस राजकोटला....

मौलवीं व मुस्लिम समाजबांधवांची बैठक​

दरम्यान,  मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या अनुषंगाने शासनाने काही निर्देश लागू केले आहेत. दरम्यान, याची माहिती व जनजागृती तसेच या निर्देशांचे योग्य पद्धतीने पालन होण्याच्या दृष्टीने चिपळूण पोलिसांनी गुरुवारी येथील पोलिस ठाण्यात चिपळुणातील मौलवीं व मुस्लिम समाजबांधवांची बैठक घेतली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा-दिलासादायक - सहा महिन्याच्या बाळाचा अहवाल निगेटिव्ह ;  रत्नागिरी कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर...

मुस्लिम बांधवांनी नमाज पठण असे करावे

 यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत ज्याप्रमाणे सामाजिक विलगीकरणाचे पालन करण्याबाबत राज्य शासनाने सूचना दिलेल्या आहेत. त्याचे पालन पवित्र रमजान महिन्यांत  करावयाचे आहे.  मशिदीमध्ये नियमित नमाज पठण तरावीह तसेच इफ्तार पार्टीसाठी एकत्र येऊ नये. घराच्या किंवा इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा एक इफ्तार करण्यात येऊ नये.

मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण करण्यात येऊ नये. कोणतेही सामाजिक धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करू नये. सर्व मुस्लिम बांधवांनी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण, तरावीह, व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्य पार पाडावे. लॉकडाऊन विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे सांगितले आहे.

हेही वाचा-काही सुखद ! मनोरंजनात्मक गेम्सआधारे विद्यार्थ्यांचा अभ्यास

यावेळी मौलवींनीही शासनाच्या निर्देशांचे पालन केले जाईल असे सांगताना ही आमची जबाबदारीच आहे, असे सांगितले. काही मुद्दे उपस्थित करण्यात आले. पोलिसांनी या मुद्यांचे निरसन केले. यावेळी तहसीलदार जयराज सुर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, पोलिस उपनिरीक्षक समद बेग, नगरसेवक कबीर काद्री, मो. अब्दुल खालिद परकार,मो. सादिक मेसती, मो. अब्दुल कादिर परकार, मो.  मुज्जम नूरमुहम्मद घारे, मो. मुश्ताक अब्दुल मजिद मजगावकर, मो. मुजमील वजीर मुकादम, मो. हाफिज यासिन बतमारे, मो. अब्दुल हमीद मणियार, मो. अब्दुल काझी, बिलाल खाटिक, नाजीम अफवारे आदी उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muslim brothers followed government rules for eid festival kokan marathi news