esakal | सावंतवाडीतील "त्या' आत्महत्येमागचे वाढले गूढ  
sakal

बोलून बातमी शोधा

Mystery Behind Suicide In Sawantwadi Sindhudurg Marathi News

सावंतवाडीतील "त्या' आत्महत्येमागचे वाढले गूढ  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - येथील मोती तलावात आत्महत्या केलेले महावितरणचे खासगी ठेकेदार उमेश बाबुराव यादव (वय 44, रा. सालईवाडा सावंतवाडी) यांचा मृतदेह आज सापडला. त्यांच्या आत्महत्येचे कारण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे प्रकरण तपासासाठी स्थानिक पोलिसांकडून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. 

येथील मोती तलावात काल (ता.1) दुपारी अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केली होती. संबंधित आपली गाडी मोती तलावाच्या काठावर लावून पाण्यात उतरत खोल पाण्यापर्यंत गेल्याची चर्चा होती. यावरून तलावात शोधमोहीम सुरू करण्यात आली होती; मात्र उशिरापर्यंत काहीच हाती लागले नसल्याने मोहीम थांबविण्यात आली होती. संबंधित व्यक्ती महावितरणचे खासगी ठेकेदार यादव असल्याचा संशय होता. बुधवारी रात्री यादव यांची मुलगी कृतिका हिने वडील बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. 

हेही वाचा - रत्नागिरी जिल्ह्यात पारा घसरल्याने यांना दिलासा 

पोलिसांनी शोधमोहीमेसाठी मालवण येथील आपत्कालीन रेस्क्‍यू टीमच्या स्कुबा पथकाला पाचारण केले. या पथकाने आज सकाळीच तलावात शोधकार्याला सुरवात केली. सकाळी नऊच्या सुमारास मृतदेह हाती लागला. तो यादव यांचा असल्याचे त्यांचे नातेवाईक रोहन किरण माने यांनी ओळखला. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रक्रियेत पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगेश जाधव, पोलिस उपनिरीक्षक अमित गोते, हवालदार प्रसाद कदम, नवनाथ शिंदे, देवदत्त कांडरकर, मालवण आपत्कालीन पथकाचे, स्कुबा डायव्हींग प्रमुख दामोदर तोडणकर, वैभव खोब्रेकर, निकीत मुळेकर, तुषार मराळ, भालचंद्र परब यांनी सहभाग घेतला. 

हेही वाचा - आरे - वारे किनाऱ्याचा पर्यटन विकास अडकला कशात ? 

यादव येथे वीज खासगी ठेकेदार म्हणून कार्यरत होते. त्यांनी उचललेले हे पाऊल नातेवाईकांसाठी धक्कादायक होते. आत्महत्येचे कारण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. याबाबत आज सोशल मिडीयावर उलटसुलट चर्चा सुरू होती. या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे वर्ग केले आहे. 
उमेश यादव यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. 

चिठ्ठीतून कारण उघड होणार ? 

दरम्यान, याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांना विचारले असता ते म्हणाले, ""या प्रकरणाचा तपास जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पथक करणार आहे. यादव यांनी मृत्यूपुर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे त्यांच्या मुलीने पोलिसांना सांगितले आहे; मात्र या कुटुंबाला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे तक्रार करण्याच्या किंवा चिठ्ठी सुपूर्त करण्याच्या मनस्थितीत हे कुटुंब आज नव्हते. पोलिसांनी या कुटुंबाला धीर दिला आहे. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारीही घेतली आहे.''