esakal | रिफायनरी प्रकल्पाने विकासाला चालना : नाना पटोले
sakal

बोलून बातमी शोधा

रिफायनरी प्रकल्पाने विकासाला चालना : नाना पटोले

रिफायनरी प्रकल्पाने विकासाला चालना : नाना पटोले

sakal_logo
By
टीम ई सकाळ

राजापूर : विधानसभा अध्यक्ष असताना रिफायनरीबाबत (nanara refinery) आपण सविस्तर माहिती घेतली असून प्रकल्पातून विकासाला चालना मिळणार असल्याने प्रकल्प झाला पाहिजे. त्याची उभारणी करताना स्थानिकांना विश्‍वासात घेणे गरजेचे आहे,अशी भूमिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यानी मांडली. रिफायनरी महाराष्ट्रात व्हावी यासाठी आपण आग्रही असून त्यासंबंधी शासनाशी चर्चा करणार असे आश्‍वासन त्यांनी रिफायनरी समर्थकाना दिले.

लाखो रूपयांची उलाढाल करीत विविध माध्यमांद्वारे विकासाला चालना देणाऱ्या रिफायनरी प्रकल्प उभारणीबाबत कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. अशा स्थितीमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीतील (mahavikas aaghadi) घटकपक्ष असलेल्या कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रिफायनरी उभारणीबाबत सकारात्मक भूमिका मांडली. रिफायनरी प्रकल्पातून विकासाला चालना मिळणार असल्याने हा प्रकल्प झाला पाहिजे. त्यासाठी शासनाशी चर्चा करणार अशी ग्वाही त्यांनी दिल्याची माहिती कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांनी दिली.

हेही वाचा: म्यूकरमायकोसिस; लक्षणे दिसताच उपचार घ्या

तौक्ते वादळामध्ये (tauktae cyclone) झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पटोले राजापुरात आले असताना त्यांची प्रकल्प समर्थक कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आंबेरकर, जुनेद मुल्ला यांनी भेट घेतली. या भेटीवेळी त्यानी हे आश्‍वासन दिले. भेटीवेळी माजी राज्यसभा खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, नगराध्यक्ष ऍड.जमीर खलिफे उपस्थित होते.या भेटीत रिफायनरी प्रकल्प उभारणीबाबत सकारात्मक चर्चा झाली.

रिफायनरी प्रकल्प उभारणीसाठी जागा देण्यासंबंधित शेतकऱ्यांनी दिलेली संमतीपत्र, नव्या आराखड्यानुसार कमी लोकांचे करावे लागणारे पुर्नवसन, संपादित केलेल्या जागेमध्ये मोजकी जाणारी मंदिरे आदींच्या अनुषंगाने सविस्तर माहिती देताना प्रकल्प या ठिकाणी लवकरात लवकर व्हावा अशी मागणी प्रकल्प समर्थकांच्यावतीने पटोले यांच्याकडे केल्याचे आंबेरकर यांनी सांगितले. विरोधकांनी विरोधासाठी विरोध न करता तांत्रिक मुद्दयावर विरोध केल्यास त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.

भूमिका निश्‍चितच स्वागतार्ह

रिफायनरी उभारणीबाबत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी घेतलेली भूमिका निश्‍चितच स्वागतार्ह आहे. प्रकल्प उभारणीसंबंधित शासनाशी बोलणार असल्याचेही त्यांनी आश्‍वासित केल्याने प्रकल्प समर्थकांचे बळ वाढले आहे असे कोकण जनकल्याण समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यानी सांगितले.

हेही वाचा: पालेभाज्या कडाडल्या; आवक घटल्याने दर वाढले