कबड्डीच्या प्रगतीत ‘मॅट’चे अडथळे...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

सिंधुदुर्गातील स्थिती - एकच ‘मॅट’ उपलब्ध; भाडेही आयोजकांना न परवडणारे

नांदगाव - जिल्ह्यात कबड्डीची क्रेझ आहे. शौकिनांबरोबरच होतकरू खेळाडूंचीही येथे कमतरता नाही; मात्र मॅट उपलब्ध नसल्याने अनेक होतकरू खेळाडूंना संधीपासून वंचित रहावे लागत आहे.

सिंधुदुर्गातील स्थिती - एकच ‘मॅट’ उपलब्ध; भाडेही आयोजकांना न परवडणारे

नांदगाव - जिल्ह्यात कबड्डीची क्रेझ आहे. शौकिनांबरोबरच होतकरू खेळाडूंचीही येथे कमतरता नाही; मात्र मॅट उपलब्ध नसल्याने अनेक होतकरू खेळाडूंना संधीपासून वंचित रहावे लागत आहे.

मातीतली कबड्डी मॅटवर आली आणि काही कालावधीतच लोकप्रियतेचे शिखरही गाठले. महाराष्ट्राचे अनेक कबड्डीपटू तरुणाईचे व कबड्डीप्रेमींचे आयडॉल बनले. जिल्ह्यातही अनेक गुणी, होतकरू, प्रतिभावंत खेळाडू आहेत, पण आज त्यांना मॅटवरील स्पर्धाचा अधिक सराव मिळणे गरजेचे आहे. पण आपल्या जिल्ह्यात एकच मॅट आहे, शिवाय त्याचे एकवेळचे भाडे पाच हजार रुपये असल्याने ते आयोजकांना न परवडणारे आहे. शिवाय ते मॅट जिल्हा कबड्डी फेडरेशन यांच्या ताब्यात असायला हवे. सध्याचे मॅट जिल्हा क्रीडा समितीकडे आहे. मॅटची संख्या वाढायला हवी, स्पर्धा वाढायला हव्यात, असे झाले तर सिंधुदुर्गातूनही अनुप कुमार, मनजीत चिल्लर, प्रदीप नरवाल पुढे येण्यास वेळ लागणार नाही.

प्रो-कबड्डीमुळे कबड्डीपटूंसाठी अच्छे दिन आले. महाराष्ट्राचा हा रांगडा खेळ घराघरात पोचला. सर्वांना या खेळाबद्दल आवड निर्माण झाली. विशाल माने, काशिलिंग, नीलेश साळुंखे, रिशांक देवाडिका आदींची नावे तोंडपाठ झाली, पण त्यामध्ये जिल्ह्यातून निवड झालेला एखादा खेळाडू दिसला असता तर आपली छाती अधिक फुगली असती.

कबड्डी खेळाची वाढती लोकप्रियता लक्षात घेता येथील युवा खेळाडूंना मॅटवर जास्त सराव मिळायला हवा. मॅटवरील स्पर्धा वाढायला हव्यात कारण मॅटवर ग्रीप मिळवणे अवघड काम असते. त्यासाठी कसून सरावाची गरज असते. हरियानासारख्या राज्यात गावागावात मॅट उपलब्ध आहेत. त्यामुळेच त्याबाजूचे जास्त खेळाडू मॅट गाजविताना दिसतात.

आपल्या जिल्ह्यात केवळ एक मॅट आहे. तेसुध्दा जिल्हा क्रीडा समितीच्या ताब्यात आहे. सध्यातेही जुने झाले आहे. एकवेळचे भाडे पाच हजार ते आयोजकांना परवडत नाही. असे असेल तर जिल्ह्यात कबड्डी वाढणार कशी? खेळाडू प्रो कबड्डीच्या मॅटवर येणार कधी? यासाठी जिल्हा कबड्डी फेडरेशनला निदान चार मॅटतरी राज्यपातळीवरून उपलब्ध व्हायला हवीत, त्याचबरोबर जास्तीत जास्त स्पर्धा व्हायला हव्यात, खेळाडू घडविण्यासाठी परिपूर्ण प्रशिक्षकांचे आखाडे असायला हवेत.

आम्हीही मॅटसाठी प्रयत्न करत असून मॅट उपलब्ध झाल्यावर आजोजकांना परवडेल असेच भाडे आकारण्यात येईल. आपल्याकडेही काही ठिकाणी आयोजक व कबड्डीप्रेमी मॅटवर पदरमोड करून मॅटवरील स्पर्धा घेत आहेत; मात्र काही ठिकाणी खेळाडूंकडे बूट नसल्याने मॅटवर उघड्या पायांनी खेळताना दिसले. यामुळे हे युवा खेळाडू हिरमुसले जातात. याकडे जिल्हा क्रीडा समितीने लक्ष द्यावे, अन्यथा घडणारा कबड्डीपटू अशा क्षुल्लक कारणामुळे कबड्डीपासून दूर जाईल.
-  दिनेश चव्हाण, सचिव जिल्हा कबड्डी फेडरेशन

कमी दराने मॅट देण्यासाठी प्रयत्न
याबाबत नांदगाव पंचायत समिती सदस्य संतोष कानडे यांनी आपण याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आयोजकांना कमीत कमी दराने मॅट उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Web Title: nandgav konkan news kabaddi problem by mat