राष्ट्रवादी प्रवेशाबाबत ‘त्या’ वावड्याच - नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

सावंतवाडी - ‘‘मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला भेटलो नाही. कोणाशी चर्चा केली नाही. असे असताना माझ्या राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत कशा काय वावड्या उठल्या? याचं मलाच आश्‍चर्य वाटतं. राष्ट्रवादीशी माझा कोणताही संबंध नाही,’’ अशी प्रतिक्रिया खासदार नारायण राणे यांनी आज येथे दिली. श्री. राणे येथे विश्‍वास यात्रेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

सावंतवाडी - ‘‘मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला भेटलो नाही. कोणाशी चर्चा केली नाही. असे असताना माझ्या राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत कशा काय वावड्या उठल्या? याचं मलाच आश्‍चर्य वाटतं. राष्ट्रवादीशी माझा कोणताही संबंध नाही,’’ अशी प्रतिक्रिया खासदार नारायण राणे यांनी आज येथे दिली. श्री. राणे येथे विश्‍वास यात्रेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

श्री. राणे हे राष्ट्रवादीशी जवळीच साधत असल्याची चर्चा होती. यावर श्री. राणे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘माझा राष्ट्रवादीशी काही संबंध नाही. माझ्याशी कोणी बोलले नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चा होणे चुकीचे आहे; परंतु त्यांची बैठक झाली. त्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर राणे देतील तो उमेदवार घेण्यात यावा, अशी चर्चा झाली. त्याबाबत मला काही माहिती नाही; परंतु त्याच्या थेट बातम्या प्रसिद्ध होणे चुकीचे आहे.’’

या वेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष संजू परब, एकनाथ नाडकर्णी, अशोक सावंत, सुधीर आडीवरेकर आदी उपस्थित होते. 

कारवाई करूनच दाखवा
आमदार नीतेश राणे व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांवर प्रदेश काँग्रेसचे लक्ष आहे, असा इशारा देण्यात आला होता, याबाबत नारायण राणे यांना छेडले असता, ‘‘हिंमत असेल तर त्यांनी कारवाई करून दाखवावी. राणेंचे नेहमीच लक्ष आहे. आजही आणि उद्याही. नीतेश राणेंनी अधिवेशन काँग्रेसचे आमदार म्हणूनच गाजविले आणि ते आजही चांगले काम करीत आहेत.’’

मराठा आरक्षणाचा माझा हेतू सफल : राणे
मराठा समाजाला आरक्षण जाहीर करताना माझ्या अहवालाचा विचार झाला याचा मला सार्थ अभिमान आहे. कोणत्याही इतर समाजाचे नुकसान न होऊ देता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा माझा मानस होता आणि तो सफल झाला. युती सरकारने खरे तर आरक्षण द्यायला चार वर्षे उशीर करायलाच नको होता, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा मराठा आरक्षणासाठी नियुक्त राणे समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांनी येथे दिली. श्री. राणे सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत.

मराठा आरक्षण जाहीर झाले. यावर ते म्हणाले, ‘‘या यशाबद्दल मी मराठा समाजाचे व मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्यांना या आरक्षणाचा लाभ होणार आहे. त्यामुळे मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांचा प्रगतीकडे जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हा मोठा विजय आहे. यासाठी मी तीन वर्ष कष्ट घेतले. युती सरकारने चार वर्षांचा विनाकारण वेळ घेतला.’’

Web Title: Narayan Rane Comment