राणेंचा कथित प्रवेश महत्त्वाकांक्षेपोटी - प्रमोद जठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

कणकवली - काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या कथित भाजप प्रवेशामागे त्यांची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आहे. या प्रक्रियेबाबत वरिष्ठांनी जिल्हा भाजपला कोणतीही कल्पना दिलेली नाही. राणेंची नाव सध्या भरकटलेली आहे. त्यांची कोंडी झाली असल्याने पक्ष प्रवेशासाठी ते फार घाई करत आहेत, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज पत्रकार परिषदेतून केली.

कणकवली - काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या कथित भाजप प्रवेशामागे त्यांची व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आहे. या प्रक्रियेबाबत वरिष्ठांनी जिल्हा भाजपला कोणतीही कल्पना दिलेली नाही. राणेंची नाव सध्या भरकटलेली आहे. त्यांची कोंडी झाली असल्याने पक्ष प्रवेशासाठी ते फार घाई करत आहेत, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज पत्रकार परिषदेतून केली.

श्री. जठार यांची आज येथे पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, ‘‘राणेंचा स्वभाव जिल्हावासीयांना चांगलाच ज्ञात आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार का, याबाबत आमच्या वरिष्ठांनी आम्हाला अद्याप विचारलेले नाही किंवा सांगितलेले नाही. राणेंचा प्रवास नागपूर ते दिल्ली आणि आता मुंबई-अहमदाबाद असा सुरू आहे. त्यांना पक्षात घ्यावे की नको, हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे; मात्र आम्ही वरिष्ठांना येथे पक्षाला ताकद द्यायची असेल तर जिल्हा भाजपला बळ द्या, असे सांगितले आहे.’’

ते म्हणाले, ‘‘राजकारण हा एक संघर्ष आहे. यात संयम ठेवावा लागतो. राणेंची जी महत्त्वाकांक्षा आहे, जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी त्यांनी संयम ठेवायला हवा. ते पक्ष प्रवेशासाठी फारच घाई करत आहेत.’’

राणेंची कोंडी केली असल्याबाबतच्या चर्चा सुरू असल्यासंदर्भात प्रश्‍न विचारला असता जठार म्हणाले, ‘‘इडीसारख्या न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असतो. न्यायालयीन बाबीत भाजप लक्ष घालत नाही. आमचा पक्ष कुणाचे वाईट चिंतीत नाही. राणेंचे मेडिकल कॉलेज होणार की नाही हे मला माहीत नाही; पण सरकारतर्फे जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणि केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र होणार आहे.

जिल्ह्यात आयुर्वेदिक महाविद्यालय व्हावे म्हणून केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळेच याला मान्यताही मिळाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तसे पत्र देण्यात आले असून यासाठी ५० एकर जागा हवी आहे. ती दोडामार्गमधील नियोजित एमआयडीसी असलेल्या आडाळीत द्यावी, अशी जिल्हा भाजपची मागणी आहे. जिल्हा ग्रामीण मार्ग व इतर मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करावेत, अशी मागणीही सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. यासाठी जिल्हा परिषदेने नाहरकत प्रमाणपत्र द्यावे. जेणेकरून सार्वजनिक बांधकामचा निधी वापरून रस्त्यांचा विकास करता येईल. यासाठी जिल्हा नियोजननेही ठराव करावा, अशी मागणी पालकमंत्री केसरकर यांच्याकडे केली आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्याचे आश्‍वासन दिले.’’

राजकीय पद ही कोणाची खासगी मालमत्ता नाही. त्यामुळे विरोध न करता पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतलाच तर तो आम्हाला बंधनकारक असणार आहे. ज्यांच्यात हिंमत आहे त्यांनी का घाबरावे? पक्षाचे काम करण्यात कोणाचीच अडचण येणार नाही. प्रत्येकाने आपले अधिकार टिकवायला हवेत. मला तरी यात कोणतीही अडचण वाटत नाही.
- प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष.

चौपदरीकरणाचे ५ जूनला भूमिपूजन
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचे भूमिपूजन ५ जूनला कणकवलीत होणार आहे. केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे भूमिपूजन होईल. याच दिवशी सावित्री नदीवरील पुलाचे उद्‌घाटन होणार असल्याचे श्री. जठार यांनी सांगितले.

आयुर्वेद प्रकल्पास केंद्राची मान्यता
जिल्ह्यातील आयुर्वेद ठेव्याचे जतन करता यावे आणि रुग्णसेवा व्हावी यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाने जिल्ह्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद संस्था स्थापनेला मान्यता दिली आहे. यासाठी ५० एकर जागेची मागणी प्रशासनाकडे केली आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचेही जठार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narayan rane entry bjp