राणेंना शिंगावर घ्यायची तयारी; राणेंच्या टिकेला केसरकरांचा तगडा जवाब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

राणेंना शिंगावर घ्यायची तयारी; राणेंच्या टिकेला केसरकरांचा तगडा जवाब

सावंतवाडी : राणेंनी मला कितीही विरोध केला तरी त्यांच्या नाकावर 'टिच्चून' तब्बल तीन वेळा आमदार झालो. त्यामुळेच राणे अंगावर आले तर मी शिंगावर घ्यायला तयार असल्याचा टोला आमदार दिपक केसरकर यांनी आज येथे लगावला. निलेश राणे यांना खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी माझी भूमिका महत्त्वाची होती; परंतु नंतर ते का खासदार होऊ शकले नाहीत याचा विचार त्यांनी करावा.

मिळालेल्या केंद्रीय मंत्रीपदाचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करावा. अन्यथा पंतप्रधान त्यांना कधी घरी बसवतील हे कळणार सुद्धा नाही, अशी टीकाही केसरकर यांनी केली. केंद्रीय मंत्री राणे यांनी काल (ता.२२) येथील कार्यकर्ता मेळाव्यात आमदार केसरकर यांच्यावर टीका केली होती. याला आज केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "राणे यांनी पंचवीस वर्षात निधी आणला तेवढा मी पाच वर्षात आणला. त्याची जाहीर पत्रके काढून वाटली. राणे यांना हवी असतील तर त्याच्या प्रती काढून पुन्हा वाटाव्या लागतील. राणे माझ्यावर वारंवार टीका करत आहेत. कारण माझ्या कामाची पद्धत त्यांना माहित झाली आहे. राणे स्वतः लोकशाही मानत नाहीत; पण मी त्यांच्या नाकावर टिच्चून तीन वेळा आमदार झालो आहे.

हेही वाचा: मोहोळ तालुक्यातील तीन हजार ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडीत

राणेंचा निरोप घेऊन राजन तेली निवडणुकीत सरपंचांकडे गेले होते तरी मला ते पराभूत करू शकले नाहीत."केसरकर पुढे म्हणाले, "राणे यांनी काल येथील कार्यकर्ता मेळाव्यात सरपंचांचा अपमान केला हे योग्य नाही. मी मंत्री असताना एखाद्या ग्रामपंचायतीला भेटायला गेलो तर सरपंचाला त्यांच्या खुर्चीवर बसायला सांगून मी बाजूला बसतो. त्यामुळे त्यांना मान कोणी दिला? हे सर्वश्रुत आहे. राणे हे माझे काय व्यक्तिगत शत्रू नाहीत; परंतु त्यांनी बोलताना तारतम्य बाळगावे. आपल्याकडे असलेल्या केंद्रीय मंत्रीपदाचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी करावा. कोणाला कमी लेखून चालणार नाही. मी मंत्री असताना कोट्यवधीचा निधी आणला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कोणाच्या पोटात दुखण्याची गरज नाही." यावेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, योगेश नाईक, राजन मुळीक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top