मोहोळ तालुक्यातील तीन हजार ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडीत

मोहोळ तालुक्यातील तीन हजार ट्रान्सफॉर्मरचा विद्युत पुरवठा खंडीत

sakal_logo
By
राजकुमार शहा

मोहोळ(सोलापुर) : मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्याकडे असलेल्या शेती पंपाच्या थकित वीज बिलापोटी महावितरणने तालुक्याच्या विविध भागातील सुमारे तीन हजार ट्रांन्सफार्मर चा वीजपुरवठा खंडित केला असून, शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. खंडित वीज पुरवठ्यामुळे जनावरांसह ऊसतोड कामगारांना ही पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण झाली आहे. द्राक्ष,डाळिंब या पिकावर करण्यात येणारी फवारणीही थांबली आहे, त्यामुळे महावितरणच्या या अडेलतट्टु धोरणाचा शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्याकडे शेती पंपाची महावितरणची कोट्यवधीची थकबाकी आहे. कोरोना महामारी मुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला भाव नाही. टोमॅटो, सिमला मिरची, कांदा शेतात खत म्हणून टाकुन देण्याची वेळ आली आहे. त्यातच गेल्या सुमारे महिन्या भरापासून पाऊस थांबेना त्यामुळे वापसा येईना, परिणामी गहू ,ज्वारी, हरभरा या पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. चालू वर्षी पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मका, तूर, उडीद ,ही पिके जाग्यावरच कुजली. त्यामुळे त्या माध्यमातून येणारे उत्पन्न थांबले, मात्र शेतीच्या मशागतीला व बियाणाला केलेला खर्च पूर्ण वाया गेला. दरम्यान शेती करण्यापेक्षा शेतीतील तण काढणे,खुरपण करणे, तणनाशकाची फवारणी करणे यासाठीच मोठा खर्च झाला आहे.

पापरी परिसरात द्राक्ष बागाचे क्षेत्र विस्तारले आहे. परिसरात सध्या दीडशे ते दोनशे एकर द्राक्ष बागांची लागवड झाली आहे. त्या पाठोपाठ सीताफळ व पेरूचीही लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष डाळिंब व आणि फळबागां वर विविध किडी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र विद्युत पुरवठा खंडित केल्याने त्यांना फवारणीसाठी पाण्याची अडचण येत आहे. त्यामुळे द्राक्षे डाळिंबा सह काकडी, कलिंगड, मिरची या पिकाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. एका एका शेतकऱ्याकडे दहा ते बारा जर्सी गाई आहेत. शेती तोट्यात असल्याने निदान दुधावर तरी घर खर्च भागावा यासाठी शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. मात्र त्या गायीच्या स्वच्छतेसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी मोठी अडचण झाली आहे.

सध्या मोहोळ तालुक्यात भीमा, लोकनेते, जकराया, आष्टी शुगर या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोरात सुरू आहे. ऊस तोडणी साठी गावोगावी ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या शेतात उतरल्या आहेत मात्र त्यांनाही पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे तोडलेली विद्युत कनेक्शन त्वरित जोडावीत अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

loading image
go to top