आता खाकी वर्दीचे स्वप्न होणार लवकरच पूर्ण ; पोलीसांनीच राबवला असा अनोखा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

सुमारे ३० युवक-युवती भरतीपूर्व प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत.

राजापूर : कोणत्याही पूर्वतयारीशिवाय थेट पोलिस भरती प्रक्रियेत सहभागी झाल्यास अनेकांच्या पदरी निराशा येते. अशा युवक व युवतींना भरतीच्या अनुषंगाने प्राथमिक मार्गदर्शन व्हावे अन्‌ त्यातून अंगावर खाकी वर्दी चढविण्याचे त्यांचे स्वप्न साकार व्हावे, म्हणून तालुक्‍यातील नाटे सागरी पोलिस ठाण्याच्या काही पोलिस बांधवांनी स्वयंस्फूर्तीने युवक-युवतींना मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा - कोकणात 'या' गावाची ओळख आहे नर्सरीचे गाव म्हणून 

नाटे येथे सुरू झालेल्या या प्रशिक्षणामध्ये लेखी परीक्षा व मैदानी परीक्षा या दोन्हींचे सहभागी प्रशिक्षणार्थींना सामाजिक दायित्वातून विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. सहभागी प्रशिक्षणार्थींना सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप काळे, कुशल हातिसकर, दीपक काळे आणि अन्य पोलिस बांधव मार्गदर्शन करत असून या उपक्रमाचा आजपासून प्रारंभ झाला. अंगावर खाकी वर्दी चढविण्याच्या उद्देशाने दरवर्षी मोठ्या संख्येने विविध भागांतील युवक-युवती पोलिस भरतीमध्ये सहभागी होतात. पोलिस भरतीतील निकषांसह लेखी आणि मैदानी परीक्षेबाबात आवश्‍यक असलेल्या माहितीचा अनेकांकडे अभाव असतो.

पोलिस भरतीबाबत कोणतीही पूर्वतयारी नसते. यावर मात करून पोलिस भरतीमध्ये जास्तीत जास्त युवक-युवतींना संधी देण्यासाठी परीक्षापूर्व मार्गदर्शन करण्यासाठी नाटे पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. सामाजिक दायित्वातून राबविण्यात येत असलेल्या या भरतीपूर्व प्रशिक्षणाची संकल्पना व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून सोशल मीडियाद्वारे इच्छुकांपर्यंत पोहचविण्यात आली होती. त्याद्वारे या प्रशिक्षणामध्ये जास्तीत जास्त युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून सुमारे ३० युवक-युवती भरतीपूर्व प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत.

हेही वाचा - जंगलात उंचीवर बांधली झोपडी अन् शिक्षण, नोकरीसाठी त्या दोघी झाल्या ऑनलाईन 

दृष्टिक्षेपात

- संकल्पना सोशल मीडियातून केली व्हायरल
- परीक्षापूर्व मार्गदर्शनासाठी पोलिसांचा पुढाकार
- भरती निकषासह लेखी, मैदानी परीक्षेचे धडे

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nate police start give a primary education related to police recruitment trainee students in ratnagiri