
मंडणगड (रत्नागिरी) :तालुक्यातून घोंगावत आणि होत्याचे न्हवते करीत गेलेल्या निसर्ग चक्री वादळात मंडणगड तालुक्यातील शाळांच्या इमारतींचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या १३४ शाळांचे १ कोटी ८३ लाख तर माध्यमिक व खाजगी २४ शाळांच्या इमारतीचे १ कोटी ४५ लाख असे एकूण ३ कोटी २८ लाखांचे नुकसान झाल्याने शैक्षणिक दालनांची वाताहत झाली आहे. याबाबत मंडणगडचे गटशिक्षणाधिकारी एन.कुचेकर यांनी माहिती दिली.
३ जून रोजी पाच तासांपेक्षा अधिक वेळ निसर्ग चक्री वादळाने तालुक्यात धुमाकूळ घातला. घरे, फळबागा उध्वस्त केल्या. ताशी १४० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने तालुक्यातील १०९ गावे व सुमारे तीनशे वाड्या बाधित केल्या. यात शाळांच्या इमारतींचा समावेश आहे. शाळांच्या इमारतींचे पत्रे, कौले उडून गेली तर काही शाळांवर अवतीभवती असणारी झाडे उन्मळून कोसळली. पावसाचे पाणी वर्ग, खोल्यांमधून घुसले. त्यामुळे शैक्षणिक साहित्य, पुस्तके, रंगरंगोटी केलेल्या भिंती, कपाट, महत्वाचे कागद भिजून गेले. अनेक सुशोभित केलेल्या शाळा भग्न अवशेष कवटाळून बसल्या. अनेक खोल्या कोसळून जमिनदोस्त झाल्या. डिजिटल क्लास रूमला फटका बसला असून शाळेच्या शोभेत भर टाकणाऱ्या आवारातील बागा नष्ट झाल्या आहेत.
सुदैवाने शाळा बंद असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र काही शाळांमधून मुंबईकर नागरिकांना कोरोन्टाईन करण्यात आले होते. त्यांनाही या वादळाचा फटका बसला. शाळांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून ग्रामस्थांच्या मदतीने पडलेली झाडे, फांद्या तोडून परिसर मोकळा करण्यात आला आहे. उडालेली कौले, कोणे नीट बसवून घेण्यात आली आहेत. मात्र काही शाळांची अवस्था खूपच गंभीर असल्याने शैक्षणिक वर्ष कसे सुरू करायचे असा प्रश्न पडला आहे. जिल्हा प्रशासनाने शाळांची दुरुस्ती तातडीने करावयाच्या सूचना केल्या असून पावसाचे दिवस असल्याने त्याला विलंब होण्याची शक्यता आहे.
आंबवली, वडवली व आतले शाळेचे मोठे नुकसान
आंबवली शाळेच्या दोन वर्गखोल्या प्रचंड आंब्याचे झाड कोसळल्यामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत. शिवाय संपूर्ण इमारतीचे छप्पर नादुरुस्त झाले आहे. तर आतले शाळेचे पूर्ण छप्पर उडाले असून वडवली शाळेवर झाड पडल्याने इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गणेशकोंड, आंबवणे बुद्रुक , उन्हवरे, वेसवी उर्दू, बाणकोट किल्ला मराठी, वेळास, वेरळ आश्रमशाळा यांचे प्रचंड नुकसान झालेलेआहे.
नुकसानग्रस्त शाळांचे सर्वेक्षण आणि अंदाजपत्रके तयार करण्याचे काम सुरू आहे. किरकोळ नुकसान असणाऱ्या शाळांची दुरुस्ती तेथील ग्रामस्थ व शिक्षकांनी सुरू केली आहे. अनेक शाळांचे या वादळात प्रचंड नुकसान झाले आहे.
- एन.कुचेकर, गटशिक्षणाधिकारी मंडणगड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.