वैभववाडीतून निसर्ग पर्यटनाची हाक

वैभववाडीतून निसर्ग पर्यटनाची हाक

वैभववाडी - जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना आता उंच मनोरा आणि पॅगोडातून निवांतपणे हिरवागार निसर्ग आणि वन्यजीवसंपदा बिनधास्तपणे न्याहळता येणार आहे. वनविभागाने करूळ घाट, भुईबावडा घाट आणि फोंडा घाट परिसर व ऐनारीच्या घनदाट जंगलात अशा पध्दतीचे दोन मनोरे आणि तीन पॅगोडा उभारले आहेत. पर्यटनवृद्धीकरिता वनविभागाने हे महत्वपूर्ण पाऊल उचलले असून, घाट पर्यटनाला त्यामुळे चालना मिळणार आहे.

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. जिल्ह्यात बारमाही पर्यटक येत असतात. पश्‍चिम महाराष्ट्रातून येणारे बहुतांशी पर्यटक हे करूळ घाट, भुईबावडा, फोंडा आणि आंबोली घाटमार्गे येतात. या पर्यटकांना घाटातील हिरवागार निसर्ग नेहमीच भुरळ घालीत असतो.

थोड्याफार फरकाने चारही घाटांच्या भौगोलिक रचनेत साम्य आढळून येते. हजारो फूट खोल दरी, घनदाट जंगल, दरीतून हेलकावत येणारे दाट धुके असे चित्र नेहमीच घाटात पाहायला मिळते. त्यामुळे कोणत्याही पायाभूत सुविधा नसताना पर्यटकांचे पाय येथे आपसूकच रेंगाळतात; मात्र आता घाटांमध्ये येणाऱ्या पर्यटकांना मनोऱ्यात उभे राहून निवांतपणे निसर्ग न्याहळता येणार आहे.

पर्यटनवाढीच्या हेतुने वनविभागाने करूळ घाट रस्त्यांपासून काही अंतरावर एक पॅगोडा उभारला आहे, तर भुईबावडा घाट रस्त्यापासून वीस फूट अतंरावर एक पॅगोडा उभारला आहे. ऐनारीच्या घनदाट जंगलात चाळीस फूट उंचीचा लोखंडी मनोरा उभारला आहे. या मनोऱ्यातून दूरवरच्या निसर्गासह वन्यजीवही पाहता येणार आहेत.

याशिवाय फोंडा घाट परिसरातही एक पॅगोडा उभारला आहे. मनोरा आणि पॅगोडा उभारण्यासाठी जिल्हा वार्षीक योजनेतून वनविभागाला सुमारे दहा लाख रूपये निधी दिला होता. त्यातून ही कामे केली आहेत. मनोरा आणि पॅगोडा उभारल्यामुळे घाट पर्यटनाला चालना मिळणार आहे. भविष्यात आणखी काही मनोरे आणि पॅगोडा उभारण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे.

‘‘जिल्हयात येणाऱ्या पर्यटकांना घाटातून निसर्ग न्याहळता यावा, या हेतुने वनविभागाने ऐनारी येथे एक मनोरा आणि करूळ, भुईबावडा आणि फोंडा घाटात प्रत्येकी एक एक पॅगोडा उभारला आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळाला होता. पर्यटनवृद्धी हाच या कामांमागील हेतू आहे.’’
- एस. बी. सोनवडेकर,
वनक्षेत्रपाल, कणकवली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com