राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणाले, पक्षविरोधी कामाचे पुरावे दाखवा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 January 2020

तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी काल कारवाई केल्यामुळे राष्ट्रवादीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. येथील पालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाच नगरसेवक आहेत.

रत्नागिरी - राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षविरोधी काम केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी झालेल्या चार नगसेवकांपैकी दोघांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अजून राष्ट्रवादीचे आहोत. पक्षविरोधी काम केल्याचे पुरावे दाखवा. नाराजी व्यक्तीशी आहे, पक्षाशी नाही, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी काल कारवाई केल्यामुळे राष्ट्रवादीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. येथील पालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाच नगरसेवक आहेत. त्यापैकी कौसल्या शेट्ये, उज्ज्वला शेट्ये, मुसा काझी, मिरकरवाडा सोहेल साखरकर यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गेल्या दीड वर्षांपासून हे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान तर काही नगरसेवकांनी सेनेच्या उमेदवार मदत केल्याचा ठपका ठेवला आहे. 

हेही वाचा - रत्नागिरी जिल्हा परिषदेत हे झाले सभापती 

तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चिन्हावर निवडून आला आहात. विधानसभा आणि नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत पक्षविरोधी काम केले आहे. त्यामुळे तुम्ही चौघांनीही नगसेवक आणि पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा द्यावा, असे आदेश तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी काढले आहेत. तसेच येत्या दोन दिवसांमध्ये आपल्या अधिकाराखाली चौघांचीही पक्षातुन हकालपट्टी करण्याचे संकेत त्यांनी दिले. तालुकाध्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरातील राजकारण गढुळ झाले आहे. दोघा नगरसेवकांनी उलट प्रतिक्रिया देऊन आम्ही राष्ट्रवादीचेच आहोत असे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - मार्लेश्वर गिरीजादेवी कल्याणविधीसाठी वऱ्हाडी मारळ नगरीत 

मी अजुनही राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आहे. मी पक्षाविरोधात काम केल्याचे पुरावा दाखवा. मी पक्षाचे काम केले म्हणून कोकणनगरला पोटनिवडमुकीत चांगली मते मिळाली. विरोधात काम केले असते तर एवढी मते पडली नसती. तालुकाध्यक्षांनी त्याचे काम केले. मी पक्षाचे काम करणार. याबाबत जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याशी चर्चा करणार आहे. 
- मुसा काझी, नगरसेवक राष्ट्रवादी

तालुकाध्यक्ष आणि पालिकेतील गट नेते सुदेश मयेकर यांनी आतापर्यंत किती बैठका घेतल्या. तालुकाध्यक्षांचे काम आम्हाला बरोबर घेऊन जाणे आहे. परंतु त्यापैकी एकही काम त्यांनी केले नाही. माझी नाराजी व्यक्तीशी आहे, राष्ट्रवादी पक्षाशी नाही. मला जनेतेने निवडून दिला आहे. राजिनामा मागण्याचा अधिकार जनतेला आहे. 

- सोहेल साखरकर, नगरसेवक राष्ट्रवादी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Corporator Says Show Proof Of Work Against Party Ratnagiri Marathi News