राष्ट्रवादीकडून आघाडीसाठी प्रस्तावच नाही 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

सावंतवाडी - आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. अद्याप राष्ट्रवादीकडून आघाडीसाठी प्रस्तावच आलेला नाही, असे कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी आज येथे सांगितले. 

सावंतवाडी - आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. अद्याप राष्ट्रवादीकडून आघाडीसाठी प्रस्तावच आलेला नाही, असे कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी आज येथे सांगितले. 

श्री. सामंत यांनी आज येथील माजी खासदार कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या वेळी तालुकाध्यक्ष संजू परब, पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत आदी उपस्थित होते. या वेळी श्री. सामंत म्हणाले, ""वेळागर येथे घडलेल्या मारामारीच्या प्रकरणात कॉंग्रेसचे नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांना नाहक अडकविण्यात आले. त्या ठिकाणी झालेली मारामारी सोडविण्याचे काम ते करीत होते. सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून खरा प्रकार उघड होत आहे; मात्र नाहक कॉंग्रेसला आणि आडिवरेकर यांना बदनाम करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. हा सर्व प्रकार चुकीचा आहे. पालकमंत्र्यांनी आपल्या गृहमंत्रिपदाचा चुकीचा वापर केला आहे; परंतु वस्तुस्थिती काय आहे, याची माहिती पोलिस यंत्रणेने घ्यावी.'' 

श्री. सामंत पुढे म्हणाले, ""जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका कॉंग्रेसच जिंकणार आहे, यात काहीही शंका नाही. सद्य:स्थितीत तालुक्‍यातून पंचायत समितीच्या अठरा जागांसाठी 82 तर जिल्हा परिषदच्या नऊ जागांसाठी 60 हून अधिक सक्षम उमेदवार इच्छुक आहेत, परंतु आघाडी होणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. याबाबत कॉंग्रेस नेते श्री. राणे हेच निर्णय घेणार आहेत; मात्र यासाठी आवश्‍यक असलेला प्रस्ताव अद्याप राष्ट्रवादीकडून आलेला नाही. त्यामुळे आमची आजही स्वबळावर लढण्याची तयारी आहे.'' 

श्री. सामंत पुढे म्हणाले,""देशात मोदींनी कॅशलेस प्रणाली आणून सर्वसामान्य जनतेला दुःखाच्या खाईत लोटण्याचे काम केले आहे. दुसरीकडे पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे आता अच्छे दिनची स्वप्ने दाखविणाऱ्या मोदींनाच लोक योग्यती जागा दाखवतील.'' 

या वेळी गुरुनाथ सावंत, आबा सावंत, दिनेश सोनुर्लेकर, संतोष कांबळी, आंतोना रॉड्रिक्‍स, पंढरी राऊळ आदी उपस्थित होते. 

"त्या' हॉटेलच्या चौकशीची मागणी 
या वेळी सभापती प्रमोद सावंत म्हणाले,""वेळागर येथील ते हॉटेल सीआरझेड क्षेत्रात उभारण्यात आले आहे. त्यामुळे या हॉटेलच्या बांधकामाची चौकशी होणे गरजेचे आहे, तशी मागणी संबंधित यंत्रणेकडे करू.''

Web Title: NCP does not lead to a proposal