मानवता छावण्यांची गरज; माजी कृषीराज्यमंत्र्यांचे मत

Need Of Humanitarian Camps Sadabhau Khot Comment
Need Of Humanitarian Camps Sadabhau Khot Comment

राजापूर ( रत्नागिरी ) - मार्केटिंगची साखळी उभारण्यासह लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांशी सुसंवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्यात राज्याचे कृषी आणि पणन खाते अपयशी ठरल्याचे मत माजी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. कोरोनाकडे संकट म्हणून न पाहता शेतकऱ्यांचे भविष्यातील प्रश्‍न सोडविण्यासाठी संधी म्हणून पाहणे गरजेचे असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. 

श्री. खोत म्हणाले, विविध प्रकारच्या पिकांना लॉकडाऊनच्या काळामध्ये अपेक्षित बाजारपेठ मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यावर मात करण्यासाठी भविष्यामध्ये राज्यभर मार्केटिंग साखळी उभी करणे गरजेचे आहे. झूम ऍपच्या माध्यमातून माजी कृषी राज्यमंत्री खोत यांनी कोकणातील पत्रकारांशी संवाद साधला. 

खोत म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात सर्व उद्योगधंदे बंद होते. मात्र सुरू असलेले शेतीउद्योग लोकांसाठी आधारवड ठरले. त्यामुळे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय हा शाश्‍वत व्यवसाय असून या व्यवसायाच्या प्रश्‍नांची सोडवणूक करून शेतकऱ्यांना न्याय देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. राज्यामध्ये त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होण्यासाठी राज्य शासनाने त्याचे चांगल्या पद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे. जेणेकरून त्याचा थेट शेतकऱ्यांना लाभ होईल. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पिकणाऱ्या काजूच्या विक्रीबाबत लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था होती. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यावर मात करण्यासाठी काजूला आधारभूत किंमत मिळणे गरजेचे आहे. कोकणातील आंबा, काजू, जांभूळ आदी पिकांची साठवणूक यंत्रणा नसल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. 

शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली होती. त्या समितीचा पाठपुरावा करणार आहे. पाऊस मोजण्याची पद्धत चुकीची असून पावसाळ्यामध्ये आपद्‌ग्रस्ताला नुकसानभरपाई मिळण्याला फटका बसतो आदी विषय पत्रकारांनी मांडले. 

मानवता छावण्यांची गरज 
दुष्काळाच्या काळामध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये शासनाने चारा छावण्या उभारल्या होत्या. त्याचा फायदा त्या काळात झाला होता. कोरोनासारख्या आपत्तीचा सामना करण्यासाठी दुष्काळी छावण्यांच्या धर्तीवर मानवता छावण्या उभे करणे गरजेचे असल्याचे मत खोत यांनी मांडले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com