esakal | निगेटिव्ह महिलेला आला पॉझिटिव्हचा मेसेज; मालगुंडमधील प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

निगेटिव्ह महिलेला आला पॉझिटिव्हचा मेसेज; मालगुंडमधील प्रकार

निगेटिव्ह महिलेला आला पॉझिटिव्हचा मेसेज; मालगुंडमधील प्रकार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रत्नागिरी : कोरोना चाचणीत बाधित आलेल्यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली जाते; परंतु निगेटिव्ह असलेल्या महिलेला पॉझिटिव्ह (positive) असल्याचा संदेश दिल्यामुळे रत्नागिरी (ratnagiri) तालुक्यातील मालगुंड येथील एका कुटुंबाने प्रचंड मानसिक त्रासाचा अनुभव घेतला. याविषयी संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे तक्रार दिली.

कोरोनाबाधित वाढत असल्याने मालगुंड (malgund) गाव कोरोना प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. आरोग्य यंत्रणेने सरसकट चाचण्या सुरू केल्या आहेत. मालगुंड येथे राहणाऱ्या एका ६५ वर्षीय महिलेचे अँटिजेन आणि आरटीपीसीआर (RT-PCR) चाचण्यांसाठी स्वॅब घेण्यात आले. अँटिजेनचा अहवाल (antigen report) निगेटीव्ह आला. आरटीपीसीआरचा अहवाल दोन दिवसांत मिळेल, असे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. दुसऱ्याच दिवशी त्या महिलेला जिल्हा परिषद आरोग्य विभागातून फोन आला की तुमची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तेव्हा तुम्ही गणपतीपुळे भक्त निवास कोविड सेंटरमध्ये दाखल व्हा.

हेही वाचा: साहित्य क्षेत्रावर शोककळा; गझलकार मधुसुदन नानीवडेकर यांचे निधन

या निरोपामुळे घाबरलेल्या त्या महिलेने हा विषय रत्नागिरीतील मुलीला कळविला. त्यानंतर सूत्र हलली. गावातील लोकांच्या सूचनेनंतर मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशी केली. तेथून सिव्हिलला चौकशीची सूचना दिली. सिव्हिलमध्ये समजले की मालगुंड येथील कोणाचाच अहवाल दिलेला नाही. मालगुंड येथील स्वॅब टेस्टिंग रात्री होणार असून अहवाल दुसऱ्या दिवशी मिळतील. या प्रकारामुळे ‘त्या’ महिलेसह नातेवाईकांना मानसिक त्रास झाला. त्याच रात्री बारा वाजता आलेल्या मेसेजमध्ये अहवाल निगेटिव्ह असल्याचे समजले. त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्याकडे लेखी तक्रारही देण्यात आली आहे.

"आरोग्य यंत्रणेकडून दूरध्वनीद्वारे माहिती देताना त्याची खातरजमा करणे आवश्यक आहे. अन्यथा या परिस्थितीमध्ये नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. यंत्रणेकडून याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे."

- डॉ. संतोष केळकर, मालगुंड

हेही वाचा: पावसाळ्यात सहज उपलब्ध होणारा बहुगुणी अळू शरीरासाठी फायद्याचा

"मालगुंड येथील त्या प्रकाराची चौकशी केली जात आहे. असे प्रकार होऊ नये यासाठी संबंधितांना सूचना दिल्या जाणार आहेत."

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी

loading image