शिवसेनेची सूत्रं नव्या नेत्यांच्या हातात; दोन बडे नेते बाजूला l Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

नव्या नेतृत्वाकडून जुन्या कार्यकर्त्यांचे पंख छाटले जात असल्यामुळे कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत.

शिवसेनेची सूत्रं नव्या नेत्यांच्या हातात; दोन बडे नेते बाजूला

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेची सूत्र माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या हाती होती. हे दोघेही नेते सध्या राजकीय प्रवाहातून बाजूला आहेत. त्यामुळे पालकमंत्री अनिल परब आणि खासदार विनायक राऊत यांच्याकडे जिल्ह्याची सूत्रे आहेत. नव्या नेतृत्वाकडून जुन्या कार्यकर्त्यांचे पंख छाटले जात असल्यामुळे कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत.

अनंत गीते सहावेळा निवडून आले. त्यामुळे रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील शिवसेनेवर त्यांची पकड होती. कोकणातील कुणबी समाजावर अनंत गीते यांचा प्रभाव होता. रामदास कदम यांचाही जिल्ह्यातील शिवसेनेत दरारा होता. शिवसेनेच्या नेतेपदावरून गीते आणि रामदास कदम यांच्यात झालेले वादही अनेकवेळा समोर आले.

हेही वाचा: अरबाज, अर्जुननंतर आता मलायका 'या' Chocolate Boy च्या प्रेमात

गीते यांनी मतदारसंघ बदलल्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची सूत्रे खासदार राऊत यांच्या हातात आली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी विधान परिषदेत जागा मिळवली. त्यावेळी कदम यांचे जिल्ह्यातील महत्व कमी झाले. गीते यांनी उत्तर रत्नागिरी भागातील खेड, दापोली, मंडणगड आणि गुहागर तालुक्यातील शिवसेनेवर वर्चस्व मिळवले होते. 2019 च्या निवडणुकीत गीतेंचा पराभव झाल्यानंतर गीते राजकीय प्रवाहातून बाजूला आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब आणि खासदार विनायक राऊत यांच्याकडे जिल्ह्यातील शिवसेनेची सूत्रे आहेत. शिवसेनेच्या सर्व नियुक्या मातोश्रीवरून जाहीर होत असल्या तरी या दोन नेत्यांच्या शिफारसी महत्वाच्या मानल्या जातात. राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यातील संघटनेत खदखद आहे. परंतु ती जाहीर होत नाही. गीते यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे समर्थकही राजकीयदृष्ट्या वाऱ्यावर आहेत. दापोली मतदार संघात शिवसेनेचा आमदार असला तरी गीते - कदम वादामुळे गीते समर्थकांकडे दुलर्क्ष होत असल्यामुळे गीते समर्थकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेण्यास सुरवात केली आहे.

अनंत गीते अस्वस्थ

अनंत गीते यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवाराने लोकसभा निवडणुकीत पराभव केला. त्याच राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे अनंत गीते अस्वस्थ आहेत. मध्यंतरी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करून आपली अस्वस्थता बोलून दाखवली. रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर जाहीर टीका करून घुसमट उघड केली आहे.

हेही वाचा: Sakal Survey : रत्नागिरीत शिवसेना वरचढचं; राष्ट्रवादी-भाजपही सज्ज

"रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन चांगले आहे. पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत. काही ठिकाणी असलेले किरकोळ वाद लवकरच दूर केले जातील. या वादांचा येणाऱ्या निवडणुकांवर काहीही परिणाम होणार नाही. सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी एक विचाराने संघटनेसाठी काम करत आहेत."

- विनायक राऊत, शिवसेना सचिव

Web Title: New Political Leaders Entry In Shivsena Ramdas Kadam Anant Gite Side

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top