भडगाव पुलावरून नदीत पडलेली नवविवाहिता बेपत्ताच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

कुडाळ - भडगाव ब्रूद्रुक पुलावरून पिठढवळ नदीत पडलेल्या अणाव दाभाचीवाडी येथील सौ. दीप्ती हरी जिकमडे यांचा तब्बल 22 तासानंतरही शोध लागला नाही. आज दिवसभर लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसह स्कुबा ड्रायव्हिंग पथकाने शर्थीचे प्रयत्न करूनही अपयश आल्याने सायंकाळी शोधमोहीम थांबविण्यात आली. ही घटना काल (ता.23) सायंकाळी उशिरा घडली होती. 

अणाव दाभाचीवाडी येथील हरी जिकमडे व त्यांच्या पत्नी दीप्ती काल (ता.23) भडगाव येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या. दोन महिन्यापूर्वीच त्यांचे लग्न झाले आहे. दाम्पत्य भडगाववरुन अणाव गावी मोटरसायकलवरून परतत होते. काल दिवसभर मुसळधार पाऊस होता. पिठढवळ नदीचा वेगही प्रचंड होता. दोघेजण अशाच पावसात येत असताना भडगाव ब्रूद्रुक पुलाजवळ अचानक रस्त्यावर साप आडवा आला. यामुळे घाबरून मोटरसायकलवरचा तोल जाऊन सौ. दीप्ती नदीत कोसळल्या.

पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने त्या वेगाबरोबर वाहून गेल्या. घटनेनंतर लगेचच शोध घेण्याचा प्रयत्न झाला; मात्र जोरदार पाऊस व रात्र यामुळे अडथळे निर्माण झाले. आज पुन्हा शोध मोहिम हाती घेण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसह स्कुबा डायव्हिंग पथकाला बोलाविण्यात आले. त्यांनी मोहीम युद्धपातळीवर राबविली मात्र काहीच सापडले नाही. सायंकाळी सहापर्यंत 22 तास उलटून गेले तरी दिप्ती यांचा शोध लागला नाही. मोहीम सायंकाळी थांबविण्यात आली.

कुडाळचे तहसीलदार मछिंद्र सुकटे, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, पोलिस यंत्रणा, पोलिस पाटील, मोठ्या संख्येने असलेले ग्रामस्थ शोध मोहिमेत सहभागी झाले होते. 

कठडा नसल्याने घात 
दिप्ती यांचे दोन महिन्यापुर्वीच लग्न झाले होते. त्या ज्या पुलावरून तोल जाऊन नदीत कोसळल्या त्याला कठडा नाही. पतीच्या म्हणण्याप्रमाणे वाटेत साप दिसल्यानंतर तोल जाऊन त्या थेट नदीत कोसळल्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newly married woman disappeared from the Bhadgaon bridge