
भारतीय जनता पक्षाची विभागीय बैठक मुंबई येथील भाजप कार्यालयात बुधवारी सकाळी आयोजित केली होती
रत्नागिरी - ग्रामपंचायत निवडणूकीत कोकणसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते, माजी खासदार नीलेश राणे यांची भाजपच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे. मुंबईत आयोजित कोकण विभागाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाची विभागीय बैठक मुंबई येथील भाजप कार्यालयात बुधवारी सकाळी आयोजित केली होती. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी प्रदेश भाजपने रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर सोपवली होती. रत्नागिरी जिल्ह्यात यापूर्वी भाजपचे अस्तित्व नगण्य होते. कार्यकर्त्यांची मजबूत फळीही उपलब्ध नव्हती. प्रतिकुल परिस्थितीत नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने रत्नागिरी जिल्ह्यात नेत्रदीपक यश मिळविले. ग्रामपंचायतीनिहाय दौरे करत त्यांनी कार्यकर्त्यांची फळी उभारली. त्याचा फायदा प्रत्यक्ष निवडणुकीत झाला. जिल्ह्यात सुमारे 301 हून अधिक जागा निवडून आणण्यात त्यांना यश मिळाले.
हे पण वाचा - येणाऱ्या काळामध्ये भाजप पक्ष दुर्बिणीमधून शोधण्याची वेळ येईल
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजपने चांगले यश मिळवले आहे. याची दखल विरोधी पक्ष नेते भाजपचे नेतृत्त्व देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली. गेल्या काही दिवसात नीलेश राणे यांनी शिवसेनेविरोधात आक्रमक पवित्रा घेत शाब्दिक हल्लाबोलही केला होता. त्यांच्या वक्तव्याची दखल राज्यस्तरावर घेतली जात असून त्याचीच पोचपावती म्हणून प्रदेश सचिवपदाची जबाबदारी नीलेश राणे यांच्याकडे सोपवली आहे.
संपादन - धनाजी सुर्वे