
गेल्या पाच वर्षांमध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्यावर विकास कामामध्ये अन्याय केला, त्याचे हे त्या पक्षाला मिळालेले फळ आहे
कोल्हापूर - ग्रामपंचायत निवडणुकीबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे विधान म्हणजे "गिरे तो भी टांग उपर' असे आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपची अवस्था दयनीय झाली असून, येणाऱ्या कार्यकाळामध्ये त्या पक्षास जिल्ह्यामध्ये दुर्बिणीमधून शोधण्याची वेळ येईल, असा टोलाही श्री. पाटील यांनी लगावला आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्यावर विकास कामामध्ये अन्याय केला, त्याचे हे त्या पक्षाला मिळालेले फळ आहे. जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या पाण्यापैकी एक थेंबही न अडवणे, जिल्ह्याच्या रस्त्याची खराब अवस्था, गोरगरीब शेतकरी व सामान्य माणसाचा विश्वासघात या गोष्टीही भाजपच्या पराभवास जबाबदार आहेत, असेही या पत्रकात म्हटले आहे.
सबब जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीने 158 ग्रामपंचायतमध्ये सत्ता मिळविली व 1336 सदस्य निवडून आले. शिवसेना व कॉंग्रेस पक्षानेही घवघवीत यश मिळवले आहे. महाविकास आघाडीची संख्या 60 टक्के इतकी होते. भाजप 20 टक्के पेक्षा कमी राहिला आहे. तथापि भाजप ग्रामीणचे अध्यक्ष "मै गिरा तो भी टांग उपर" या पद्धतीने विधान करीत आहेत. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 19 जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस होता. आमचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचा वाढदिवस आहे, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निर्णयावर त्यांच्यावर टिकास्त्र करू नका, असा सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. कारण, वाढदिवस वर्षातून एक दिवस येत असतो. त्या दिवशी कोणालाही दुःख, यातना, वेदना होऊ नयेत, ही त्यांची भावना होती. त्यांना वाढदिवसाच्या राष्ट्रवादी पक्षाकडून शुभेच्छा देत असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.
हे पण वाचा - कोल्हापूरच्या सुपुत्राने केले दृष्टी सक्षम करणारे सोलर सेलचे संशोधन
'शाहू' च्या कार्यक्षेत्रात धुव्वा
या निकालावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते, शाहू साखर कारखान्याच्या पट्ट्यातील 15 गावांमध्ये एकाही गावांमध्ये भाजपची सत्ता आली नाही. आजपर्यंत राजे गटाचे प्रभावक्षेत्र होते, त्या ठिकाणी ही अवस्था आणि भाजपच्या विजयाच्या बाता कशाला करता? असा सवालही श्री. पाटील यांनी या पत्रकात उपस्थित केला आहे.
संपादन - धनाजी सुर्वे