‘मातोश्री’वर पैशाचे राजकारण - नीलेश राणे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018

भोकेतील ग्रामस्थांच्या केसाला धक्का लागला, तर मी त्यांच्या मागे उभा आहे, असा इशारा ‘स्वाभिमान’चे सरचिटणीस नीलेश राणे यांनी दिला.

रत्नागिरी - ‘मातोश्री’वर केवळ पैसा चालतो. जिल्हा शिवसेनेच्या ताब्यात आहे, पण मतदारांना काय मिळाले. बेरोजगारी, दरडोई घटते उत्पन्न, महामार्गाची रखडलेली कामे. तुम्ही फक्त मते द्यायची, त्याचा फायदा पुढाऱ्यांनी घ्यायचा. हे चित्र बदलायला हवे. आता कुणी अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका. भोकेतील ग्रामस्थांच्या केसाला धक्का लागला, तर मी त्यांच्या मागे उभा आहे, असा इशारा ‘स्वाभिमान’चे सरचिटणीस नीलेश राणे यांनी दिला.

रेवाळेवाडीतील चारशेहून अधिक ग्रामस्थांनी स्वाभिमानमध्ये प्रवेश केला. यासाठी अमित देसाईंनी महत्त्वाची भूमिका घेतली. भोके-रेवाळेवाडीतील या ग्रामस्थांच्या ‘स्वाभिमान’ पक्ष प्रवेशाप्रसंगी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्थानिक आमदार उदय सामंत यांच्यावर शेलक्‍या भाषेत टीका केली.

राणे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात असे काय घडले की, विकास न होताही जनता शिवसेनेच्या पाठिशी उभी आहे. हे फक्‍त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करीत आहेत. सत्ता असूनही विकास खुंटला आहे. स्थानिक आमदारांना विकासाचे देणेघेणे नाही. विरोधात जाणाऱ्यांवर दबाव टाकला जातो. याला विरोध करीत भोके रेवाळेतील ग्रामस्थ स्वाभिमानमध्ये दाखल झाले. त्यांचे मी स्वागत करतो. येथील पुलाचा आणि रस्त्याचा प्रश्‍न मी सोडवेन.  मातोश्रीवर केवळ पैसा चालतो.आमदारांना पैसे देऊन पद मिळविता येते. राणे नको म्हणून मागीलवेळी खासदार विनायक राऊत निवडून आले. भविष्यात ते निवडून येणार नाहीत. 

डांबर घोटाळा बाहेर काढू
रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची आहेत. त्यासाठी १९९९ पासूनच डांबर घोटाळा आम्ही लवकरच बाहेर काढणार आहोत, असे याप्रसंगी राणे यांनी जाहीर केले.

Web Title: Nilesh Rane Comment