कोकणच्या विकासावर बोलतो म्हणून विरोध

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

वालम चालतात, मग राणे का नाही?
ज्या अशोक वालम यांनी शिवसेनेवर, उद्धव ठाकरे यांच्यावर अश्‍लाघ्य टीका केली, त्यांच्या मांडीला मांडी लावून शिवसेनेचे आमदार, खासदार बसतात, त्यांना मिठी मारतात. शिवसेनेवर घाणेरडी टीका करणारे वालम त्यांना चालतात, मग राणे का नाही? आपण यासाठी लवकरच वालम यांची भेट घेणार. 

लांजा - आपली लढाई कोणत्या पक्ष, व्यक्तीशी नसून कोकणच्या विकासासाठी आहे. मात्र कोकणच्या विकासावर बोलतो म्हणून आपणाला विरोध केला जातो. कोकणी जनतेचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे, त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. ही आपली प्रामाणिक भावना आहे. शेवटच्या श्वासापर्यंत कोकणातील जनतेसाठी काम करणार, अशी ग्वाही नीलेश राणे यांनी येथे दिली. 

स्वाभिमान पक्षाचा लांजा तालुका कार्यकर्ता मेळावा शहरातील अजिंक्‍य मंगल कार्यालयात झाला. राणे म्हणाले, मागील चार-साडेचार वर्षांत कोकणात फार मोठा बदल होईल. मोठे उद्योग व्यवसाय सुरू होतील, आरोग्य सेवा सुधारेल असे चित्र उभे केले गेले होते. प्रत्यक्षात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या २५ वर्षांपासून येथे शिवसेनेची सत्ता आहे.

येथील जनतेची विकासाच्या नावाखाली फरफट सुरू आहे. मग आमदार काय करतात. मुंबई-गोवा महामार्गासाठी १८ हजार कोटी देण्याचे केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले होते. रत्नागिरी सिंधुदुर्गापेक्षा भौगौलिकदृष्ट्या मोठा तरीही दोन्ही जिल्ह्याचे बजेट २३ कोटींचे आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो, तर रत्नागिरी जिल्हा २३ व्या क्रमांकावर आहे. 

भाजपचे प्रमुख कार्यकर्ते स्वाभिमानमध्ये
लांजा शहरातील प्रमोद कुरूप, गुरुप्रसाद तेली, बाबू चव्हाण, अतुल आवळेगावकर,माजी ग्रा.पं. सदस्या संपदा कुरूप, नीलम शेट्ये या भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह १०० हून अधिक कार्यकर्त्यांनी आणि वेरवली येथील भरत कोळवणकर व अन्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केला. 
 

Web Title: Nilesh Rane comment