करपलेली भाकरी परतायची वेळ कोकणात आलीय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

कोकणात विकास झालेला नाही, येथील खासदारांना विकासाची, येथील समस्यांची माहिती नाही. तेव्हा करपलेली भाकरी परतायची वेळ आली आहे, २०१९ च्या निवडणुकीत संधी द्या, असे आवाहन  ‘स्वाभिमान’चे सरचिटणीस नीलेश राणे यांनी केले.

रत्नागिरी - कोकणात विकास झालेला नाही, येथील खासदारांना विकासाची, येथील समस्यांची माहिती नाही. तेव्हा करपलेली भाकरी परतायची वेळ आली आहे, २०१९ च्या निवडणुकीत संधी द्या, असे आवाहन  ‘स्वाभिमान’चे सरचिटणीस नीलेश राणे यांनी केले.

‘स्वाभिमान’तर्फे आयोजित मांजरे येथील ग्रामस्थांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे या परिसरातील विविध विकासकामांसाठी खासदार नारायण राणेंच्या फंडातून निधी मिळाला. यावेळी बाबू पाटील, विकास पाटील, राजन देसाई, भाऊ देसाई, अमर देसाई, अमित देसाई, संकेत चवंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

राणे म्हणाले, रत्नागिरीने अवघ्या महाराष्ट्राला नीलेश राणेंची ओळख दिली. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी पुढे झालो आहे. कोकणावर सेनेचे विशेष लक्ष आहे, असे सांगितले जाते पण गेल्या पाच वर्षांत खासदारांनी रत्नागिरीसाठी काय दिले ते माहित नाही. नवीन काय ते दिसत नाही. खासदार सभागृहातच नव्हे, तर मतदारसंघात दिसत नाहीत. ज्याला कोकणची माहिती नाही, मोदी लाटेत निवडून आले अशा विद्यमान खासदारांचे पार्सल घरी पाठवायची वेळ आली आहे. 

रत्नागिरीच्या आमदारांच्या तीन टर्म झाल्या, म्हणजे १४ वर्षाचा वनवास संपला. रस्ता देतो असे सांगून मतदान मागितले. पण त्यांच्या यादीत मांजरे रस्ता आहे का हे सांगू शकत नाही. करपलेली भाकरी परतायची वेळ आली आहे. याचा विचार करा.

युतीवर तीव्र नाराजी
शिवसेना-भाजप युतीवर नीलेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. ते म्हणाले, की २०१९ ची निवडणूक सर्वसाधारण नाही. गेली साडेचार वर्षे भांडत राहिलेले आता युती करीत आहेत. एकमेकांचे तोंड ज्यांनी पाहिले नाही, ते एकत्र येतात. नक्‍की काय झाले समजले नाही; पण युती झाली तरीही आम्हाला काहीच फरक पडत नाही.

Web Title: Nilesh Rane comment