ठेकेदारीच्या पैशातूनच आमदारांच्या भावाकडून जनतेला अगरबत्ती, खडीसाखर वाटप

ठेकेदारीच्या पैशातूनच आमदारांच्या भावाकडून जनतेला अगरबत्ती, खडीसाखर वाटप

मालवण -  ः गेल्या साडेचार वर्षांत या मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांचा ठेका आमदारांचाच भाऊ घेत असून, ठेकेदारीच्या पैशातूनच ते जनतेला अगरबत्ती आणि खडीसाखर वाटत फिरत असल्याची टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे केली.

‘स्वाभिमान’चे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी आडारी-न्हिवे या पर्यायी रस्त्यासाठी दिलेल्या निधीतून कामाचा प्रारंभ आज राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, अशोक तोडणकर, यतीन खोत, कृष्णनाथ तांडेल, सभापती सोनाली कोदे, बाबा परब, कोळंब सरपंच प्रतिमा भोजने, सनी कुडाळकर,राऊळ, विजय नेमळेकर, गोपीनाथ तांडेल, संदीप भोजने, मंदार लुडबे, सूर्यकांत फणसेकर, निखिल नेमळेकर, रामदास ढोलम, बबन मलये, हरिश्‍चंद्र ढोलम, हनुमंत ढोलम, मनोहर करंगुटकर, विशाल ढोलम, अनिल मलये, अरुण ढोलम, आत्माराम ढोलम उपस्थित होते. 

राणे म्हणाले, ‘‘आमदार नाईक यांच्यात पर्यायी मार्गाला निधी देण्याची क्षमता नसल्याने संघर्ष समितीला खासदार नारायण राणे यांनी २५ लाखांचा निधी मंजूर करून दिला. सत्ताकाळात या आमदार, खासदारांनी केलेली पाच विकासकामे जाहीर करावीत. राणे हे आमदार असते तर आज ही कोळंब परिसरातील ग्रामस्थांवर अशी वेळ आली नसती आणि कोळंब पुलाच्या दुरुस्तीचे काम केव्हाच मार्गी लागले असते. खासदार विनायक राऊतांना जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यास वेळ नाही. खडी, डांबर हाच नाईकांचा व्यवसाय असून, शासकीय रस्त्यांची कामे घेऊन त्यांचा भाऊ करोडो रुपये कमावतो आणि त्याच पैशातून जनतेला अगरबत्ती, खडीसाखर वाटली जाते.’’ 

सत्ताधाऱ्यांनीच वाळू प्रश्‍न रखडवला
माजी खासदार राणे म्हणाले, ‘‘वाळू प्रश्‍न सत्ताधाऱ्यांनीच मांडवलीसाठी रखडविण्याचे काम केले आहे. त्यामुळेच अधिकारी वर्ग कोणालाही जुमानत नाही. प्रशासनात पालकमंत्र्यांचा वचक नाही. खासदार राऊत मुंबईतील गुजराती व्यापाराला हाताशी धरून सामूहिक विवाहसोहळे करून जनतेची दिशाभूल करीत आहेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com