'मानलं पवार साहेब आपल्याला..महिनाभर कौतुक करता आणि एक दिवसात वर्षभराची उतरून टाकता'

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

महाराष्ट्रात स्वबळावर भगवा फडकवायचा आहे, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाक्यावर राष्ट्रवादीचे अधक्ष शरद पावर यांनी प्रतिक्रिया दिली आहे

कणकवली : मानलं पवार साहेब आपल्याला, महिनाभर कौतुक करता आणि एक दिवसात वर्षभराची उतरून टाकता. पवार साहेबांनी एका वाक्यात कान टोचले व कानपटीत पण दिली. अशा शब्दांत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.  

विधानसभेच्या तयारीला लागा, महाराष्ट्रात स्वबळावर भगवा फडकवायचा आहे, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाक्यावर राष्ट्रवादीचे अधक्ष शरद पावर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्वबळावर भगवा फडकवणार हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकत आलो आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या याच वाक्यावर ट्विक करून राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडविली आहे. राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''मानलं पवार साहेब आपल्याला... महिनाभर कौतुक करता आणि एक दिवसात वर्षभराची उतरून टाकता. पवार साहेबांनी एका वाक्यात कान टोचले व कानपटीत पण दिली.'' 

महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले. दसरा मेळाव्यात मांडलेल्या भूमिकेबद्दल शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी बैठकीत उद्धव ठाकरे यांचे जोरदार अभिनंदन केले. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे आवाहन केले. त्यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

<

>

 

हे पण वाचामोठी बातमी; भारतातील पहिला शस्त्रक्रिया प्रयोग कोल्हापुरात ; समुद्री कासवाला बसविले कृत्रिम पाय 

शरद पवार म्हणाले की, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचे स्वातंत्र्य आहे. गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे भाषण ऐकत आलो आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना दिलेल्या आदेशातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. महाविकास आघाडीतील सर्व पक्षाच्या नेत्यांना आपला पक्ष मोठा करण्याचे स्वातंत्र्य आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढवाव्या का? हा निर्णय इतर संबंधित पक्ष आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील घेतील. मात्र, भाजपला दूर ठेवण्यासाठी आपण एकत्र आलो आहेत, हे महाविकास आघाडीतील नेत्यांनी विसरू नये. महाविकस आघाडी सरकारला राज्यातील जनतेची पसंती आहे. जनतेच्या भल्यासाठी निर्णय घ्या.''

हे पण वाचाशिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेत व्यत्यय 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nilesh rane criticism on shiv sena sharad pawar statement