सावंतवाडी तहसील कार्यालयाचे काम निकृष्ट

सावंतवाडी तहसील कार्यालयाचे काम निकृष्ट

सावंतवाडी - तहसील कार्यालयाचे काम निकृष्ट झाल्याचा प्रकार आज खुद्द महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते तथा आमदार नीतेश राणे यांनी उघड केला. खिडक्‍या, दरवाजे मोडलेले, तसेच अर्धवट वायरिंग असताना काम करणार कसे? असा सवाल करत त्यांनी स्वतः कार्यालयात फेरफटका मारला.

अशाप्रकारे निकृष्ट दर्जाचे काम झालेले असताना इमारत ताब्यात कशी काय घेतली? उद्‌घाटन कसे केले? असा सवाल तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना करत १५ दिवसांत कार्यालयाचे काम पूर्ण न झाल्यास कार्यालय बंद करण्याचा इशारा दिला.
येथील तहसील प्रशासकीय इमारतीचे काम वादात सापडले होते. त्याचा उद्‌घाटन सोहळा झाला होता. इमारतीचे काम अपूर्ण असताना उद्‌घाटन झाल्याचा प्रकार राणे यांच्या कानावर पडल्यानंतर खुद्द राणेंनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत धाव घेत पाहणी केली. संजू परब, राजू बेग, मंदार नार्वेकर, उदय नाईक, नितीन कुडतरकर, केतन आजगावकर, मनीष दळवी आदी उपस्थित होते.

नव्या इमारतीला लावलेल्या खिडक्‍या, दरवाजे, काचा जुन्याच असल्याचे दिसले. काही ठिकाणी रंगरंगोटी झाली नाही तर काही ठिकाणी नुसता एक हात रंग मारल्याचे दिसले. अर्धवट काम असताना तुम्ही इमारत ताब्यात कशी काय घेतली असा प्रश्‍न राणे यांनी तहसीलदार म्हात्रे यांना केला. यावेळी काही झाले तरी काम तत्काळ पूर्ण करून घ्या. त्यासाठी आवश्‍यक असल्यास १५ दिवस कार्यालय बंद ठेवा, असे राणे यांनी सांगितले. यावर म्हात्रे यांनी १५ दिवसांत काम पूर्ण करून घेण्याचे आश्‍वासन दिले.

केवळ श्रेय मिळण्यासाठी अर्धवट स्थितीतील इमारतीचे उद्‌घाटन पालकमंत्री केसरकर यांनी केले; मात्र ही इमारत पुढे किती काळ टिकेल यावर शंका आहे. अशा प्रकारची अर्धवट कामे जिल्ह्यात होत होत असतील तर कठीण आहे. त्यामुळे शिवसेनेच्या काळात जी कामे झाली त्याची चौकशी करण्याची मागणी अधिवेशनात करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.

स्वच्छतागृह अस्वच्छ
तहसील कार्यालयात गेल्यानंतर आमदार राणे यांनी तहसीलदारांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. तेथील स्वच्छतागृहात जातो असे सांगितले; मात्र आत पाहणी केल्यानंतर तेथे अस्वच्छता असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे खुद्द तहसीलदारांच्या केबिनमधल्या बाथरूममध्ये इतकी अस्वच्छता असेल तर कार्यालयाचे काय न बोललेलेच बरे, असे सांगून स्वच्छतागृहात जाणारे राणे तसेच परतले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com