उसप येथील युवकाच्या घातपाताचा संशय

उसप येथील युवकाच्या घातपाताचा संशय

दोडामार्ग - उसप येथील रामचंद्र तथा नितीन मोरजकर (वय २१) या युवकाचा कळंगुट गोवा येथे झालेला मृत्यू आत्महत्या नसून तो घातपातच असल्याचा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. 

मुलाशी दोडामार्गमधील एका मुलीचे प्रेमसंबंध होते, त्यातूनच त्या मुलीच्या कुटुंबीयांकडून त्याचा घातपात केल्याची शक्‍यताही त्यांनी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी त्या मुलीच्या वडिलांनी रामचंद्र याला त्याच्या घरी येऊन ठार मारण्याची धमकी दिली होती, अशी माहितीही त्याचे आई-वडील आणि नातेवाइकांनी 
दिली. त्याबाबत दोडामार्ग पोलिस ठाण्यात संशयितांच्या नावासह तक्रार दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रामचंद्र याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता.

कळंगुट गोवा येथील एका हॉटेलमध्ये तो कामाला होता. मात्र, शुक्रवारी (ता. १७) मध्यरात्रीनंतर दीड-दोनच्या दरम्यान खोलीबाहेर पडला आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह तो राहात असलेल्या खोलीपासून जवळच्या जागेतील एका झाडाला लटकलेला आढळला. त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला होता.

प्रथम दर्शनी ती आत्महत्या असल्याची नोंद गोवा पोलिसात केली असली तरी त्याचे आई-वडील आणि बहिणीने ती  आत्महत्या नसून त्याचा प्रेम प्रकरणातून घातपात करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्या रात्री तो दीड वाजेपर्यंत गावातील सागर देसाई या मित्राचा वाढदिवस असल्याने त्याच्याशी व्हॉटस्‌ ॲपवर चॅटिंग करत होता. तसेच रात्री साडे अकराच्या दरम्यान तेथे कामाला असलेल्या गावातील एका युवकासोबत त्याने शीतपेय पिऊन दुसऱ्या दिवशी दोघांनी घरी जाण्याचा बेतही आखला होता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीपैकी नव्हता. प्रत्येक गोष्ट तो चुलत भावाशी आणि नातेवाइकांशी शेअर करायचा, त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, यावर कुणाचाच विश्वास नाही. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार ती युवती रात्री-अपरात्री रामचंद्रला मोबाईलवर संपर्क साधून त्याला हैराण करीत असे.

एका रात्री तिने त्याला गोव्यातून कामावरून बोलावून घेतले होते. तू आला नाहीस तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी तिने दिली होती. त्यामुळे पहाटे चार वाजता तो तिला भेटण्यासाठी गोव्यातून दोडामार्गमध्ये आला होता. त्यावेळी त्या  दोघांना मुलीच्या वडिलांनी पाहिल्याने दुसऱ्या दिवशी रात्री मुलीचे वडील दोघा नातेवाईकांसोबत त्याच्या उसप येथील घरी गेले होते आणि तुमच्या मुलाला आमच्या मुलीच्या भानगडीत पडू नका असे सांगा, नाहीतर त्याला मारून टाकू, अशी धमकी दिल्याची माहिती रामचंद्रच्या कुटुंबीयांनी दिली.

गोवा पोलिसांच्या तपासावर संशय
मृत रामचंद्राच्या नातेवाईकांनी गोवा पोलिसांच्या तपासाबाबत संशय व्यक्त केला आहे. त्याच्या मृतदेहाचा पंचनामा नातेवाईक घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी करण्यात आला होता. तसेच त्याचे पाय जमिनीला टेकले होते, शिवाय त्याच्या दोन्ही हाताला जखमा झाल्या होत्या. रामचंद्रचे ज्या युवतीशी प्रेमसंबंध होते, त्या युवतीचे नातेवाईक गोव्यात पोलिस खात्यात वरिष्ठ पदावर आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तपासाबाबत आपणास संशय असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचे घरी येणे होते बंद
संबंधित युवतीच्या वडिलांनी घरी येऊन ठार मारण्याची धमकी रामचंद्रला दिली होती, तसेच त्यांच्या उसपमधील एका दिव्यांग नातेवाईकानेही त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्या दिवसापासून रामचंद्रने घरी येणे बंद केले होते. तो कळंगुट गोवा येथेच अन्य कर्मचाऱ्यांसोबत राहायचा. तरीही त्याच नातेवाईकाने रामचंद्रच्या बहिणीलाही त्याला ठार मारणार, असे खुणेने सांगितले होते. वारंवार दिली जाणारी धमकी आणि त्याचा संशयास्पद मृत्यू यामुळे तो घातपातच असल्याची खात्री नातेवाईकांना वाटते आहे.

दोडामार्ग पोलिसांकडे बोट       
मृतदेह आणण्यासाठी त्याचे गोव्यात राहणारे काका गेले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना कुणावर संशय आहे का, असे विचारले होते, पण ते गोव्यात राहत असल्याने आणि त्यांच्या प्रेमसंबंधाबद्दल त्यांना काही माहीत नसल्याने त्यांनी नाही म्हटले; पण खरे कळल्यावर तशी तक्रार करण्यासाठी ते गोवा पोलिसांकडे गेले असता त्यांनी आता आपल्याकडे मृतदेह सोपवला, त्यामुळे तक्रार असेल तर दोडामार्ग पोलिसांकडे करा, असे सांगितले. त्याबद्दल नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com