डॉक्‍टरांअभावी रुग्ण बाहेर पाठविण्याची नामुष्की

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016


जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन व सोनोग्राफीसारख्या महत्त्वाची मशीन गेली अनेक महिने बंद आहेत; मात्र तरीही सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ द्यावाच लागतो. त्यामुळे या सुविधा खासगी दवाखान्यामार्फत घ्याव्या लागतात. त्यासाठी शासनाला प्रतिमहा सुमारे 4 लाख रुपये मोजावे लागत आहेत. जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना द्याव्या लागणाऱ्या या सुविधेपोटी शासनाला येणाऱ्या या खर्चातून नवीन मशिनरी उपलब्ध होऊ शकते.
- डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गंभीर रुग्णांना जिल्ह्याबाहेर पाठविले जाते. ही वस्तुस्थिती आहे; मात्र येथे असलेल्या तज्ज्ञ डॉक्‍टरांची कमतरता व वेळीच उपलब्ध न होणारे खासगी तज्ज्ञ डॉक्‍टर या समस्येमुळे काही वेळा रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी जिल्ह्याबाहेर पाठवावे लागते, अशी कबुली जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्हा रुग्णालयाकडून जनतेला देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत व येत असलेल्या तक्रारींबाबत डॉ. कुलकर्णी यांना छेडले असता ते म्हणाले, ""जिल्हा रुग्णालयाकडून जास्तीत जास्त चांगली सेवा जनतेला देता यावी या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या सेवेबाबत काही तक्रारीही आल्या; मात्र मी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करून कारभारात सुधारणा केली आहे. या ठिकाणी प्रतिमहिना चार ते पाच एवढ्या होणाऱ्या प्रसूतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रतिमहिना 30 ते 40 एवढ्या प्रसूती या ठिकाणी होत आहेत. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना चांगली सेवा मिळत आहे; मात्र जिल्हा रुग्णालयातील सध्या तज्ज्ञ डॉक्‍टरांची 19 पदे रिक्त आहेत. यासाठी दर गुरुवारी जिल्हा रुग्णालयात मुलाखती घेतल्या जातात; मात्र डॉक्‍टरच येत नाहीत किंवा आले तर ते मागतील त्या ठिकाणी त्यांनी नियुक्ती देऊनही ते हजर होत नाहीत.''
जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सद्यःस्थितीत सहा डायलेसिस मशिन कार्यरत आहेत. नव्याने 12 डायलेसिस मशिन मंजूर झाली आहेत. ती वेंगुर्ले, देवगड व कणकवली या रुग्णालयांना प्रत्येकी चार याप्रमाणे पुरविण्यात येणार आहेत.
जिल्हा रुग्णालय व वेंगुर्ले लायन्स क्‍लब यांच्यावतीने मोफत मोतिबिंदू तपासणी सुरू झाली असून सुमारे 90 जणांवर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच डोळ्याने तिरळे असणाऱ्यांचे लवकरच तपासणी शिबिर आयोजित करून तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून तपासणी केली जाणार आहे. तिरळेपणा घालविण्यासाठी काही पात्र लाभार्थ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याची माहिती या वेळी डॉ. कुलकर्णी यांनी दिली.
ते म्हणाले, ""जिल्हा रुग्णालयात काही वेळा गंभीर अवस्थेत रुग्णाला आणले जाते. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या कमतरतेमुळे त्या गंभीर रुग्णावर तत्काळ उपचार करणे शख्य होत नाही. अशा वेळी खासगी डॉक्‍टर तत्काळ उपलब्ध करावा लागतो; मात्र जिल्हा रुग्णालयाचे ठिकाण हे शहरी नसल्याने या ठिकाणी जवळपास तज्ज्ञ डॉक्‍टर नाहीत. अशा वेळी कणकवली, कुडाळ, सावंतवाडीसारख्या शहरातील तज्ज्ञ डॉक्‍टरांची सेवा मागितली जाते; मात्र त्यावेळी त्यांच्याकडेही रुग्णसेवा अगर शस्त्रक्रिया सुरू असल्यास डॉक्‍टर वेळीच उपलब्ध होत नाहीत. अशा वेळी गंभीर रुग्णाला येथे ऍडमिट करून ठेवून डॉक्‍टरांची प्रतीक्षा करणे हे संबंधित रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. अशावेळी गंभीर रुग्णाला जिल्ह्याबाहेर उपचारासाठी पाठवावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. मात्र सरसकट सर्वच रुग्णांना पाठविले जात नाही.''
--------------------
चौकट
कर्मचाऱ्यांमधील वाद संपुष्टात
गेल्या काही महिन्यांपूर्वी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी व डॉक्‍टर यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या बदनामीसह कामकाजावरही परिणाम होत होता. कर्मचाऱ्यांमध्ये दुसऱ्याला अडचणीत आणण्याच्या वृत्तीचा रुग्णांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत विचारले असता, आता कर्मचाऱ्यांमधील वाद संपुष्टात आला आहे. मी स्वतः जिल्हा रुग्णालयात नेहमी उपलब्ध असल्याने त्यावर चांगलेच नियंत्रण मिळविले आहे, असेही या वेळी डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

तज्ज्ञ डॉक्‍टरांची पदे भरलीच पाहिजेत
जिल्हा रुग्णालयातील आवश्‍यक तज्ज्ञ डॉक्‍टरांची रिक्त पदे भरण्याची गरज आहे. तसेच अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सीटी स्कॅन व सोनोग्राफी मशिन्स उपलब्ध झाली पाहिजेत. तर आणखी चांगली सेवा सर्वसामान्यांना मिळू शकेल. कार्यरत डॉक्‍टरांवरही कामाचा ताण पडणार नाही, असे या वेळी डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: no doctor, patients suffer