निधीच नाही तर आपत्ती व्यवस्थापन करायचे कसे....

नागेश पाटील
Thursday, 23 April 2020

आपत्ती व्यवस्थापन विभागात निधीच उपलब्ध नसल्याने शेखर निकम यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रव्यवहार करून वस्तुस्थिती मांडली.

चिपळूण (रत्नागिरी) : दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे दसपटी विभागातील अनेक गावांना फटका बसला. त्याचे पंचनामे झाले तरी आपत्ती व्यवस्थापन विभागात निधीच उपलब्ध नसल्याने शेखर निकम यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रव्यवहार करून वस्तुस्थिती मांडली. तत्काळ निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली. त्यानुसार लवकरच निधी उपलब्ध होऊन नुकसान भरपाई मिळेल, अशी आशा आमदार निकम यांनी व्यक्त केली.

 
आमदार निकम यांनी दसपटी विभागाचा दौरा करून पाहणी करताना मदतीचा हात दिला. नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. बाधित लोकांना मदत मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार निकम यांनी पाहणीदरम्यान सांगितले.अवकाळी पडलेल्या गारपीट व वादळी वार्‍याचा फटका अनेक गावांना बसला. काही घरांचे छप्पर उडून गेले तर काहींची कौले, पत्रे फुटल्यामुळे बेघर व्हावे लागलेल्या लोकांसाठी आमदार शेखर निकम यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे केला.

नुकसानग्रस्तांसाठी अजित पवारांना साकडे

हेही वाचा- ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणासाठी सरसावले हे हात......

धनगरवाडीत काही घरांवरील कौले फुटली, त्यांना कौले तर काहींना पत्रे उपलब्ध करून दिले. आज निकमांच्या सह्यादी शिक्षण संस्थेचेपण नुकसान झाले असतानाही त्याकडे लक्ष न देता गोविंदराव निकम यांच्याप्रमाणेच आज अनेकांना मदतीचा हात पुढे केला. त्याचबरोबर दसपटी भागातील रिकटोली, आकले, तिवरे, शिरगाव, पोफळी सय्यदवाडी आदी गावांचा दौरा करून पाहणी केली. त्या वेळी तेथील सरपंच व तलाठी यांच्याकडून पंचनामे व्यवस्थित झाले आहेत की नाहीत याचीही माहिती घेतली.

हेही वाचा- आयसोलेशनमध्ये आणखी 12 जण ; सिंधुदुर्गात 33 अहवालांची प्रतीक्षा

दसपटी विभागाची पाहणी

वादळी वारा व गारपीटच्या पावसाने सार्‍यांना झोडपले तर शिरगाव येथील धनगरवाडीतील अनेक घरांचे छप्पर उडून गेले. त्यामुळे अनेकजण बेघर झाले याची माहिती पंचायत समिती सदस्य बाबू साळवी यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि धनगर बांधवांना कौले उपलब्ध करून दिली. घरासाठी कौले देऊन त्यांना मायेची एकप्रकारे पांघरूण घातली. त्यामुळे शिरगाव येथील धनगर बांधवांनी बाबू साळवी यांचे आभार मानले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no Funding in the Disaster Management Department in ratnagir kokan marathi news