अन्य पक्षांत जाण्याचा प्रश्‍नच नाही - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

सावंतवाडी - जिल्ह्यात असलेल्या नारायण राणेंच्या एकतर्फी प्राबल्याला धक्का देण्यासाठी कोणत्याही पक्षांत जा, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला त्या वेळी दिला होता. चांगले कार्यकर्ते आपल्या पक्षात यावेत, असे सर्वांनाच वाटते; परंतु आता व्यक्तिगत स्पर्धेपेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे. यामुळे अन्य पक्षांत जाण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही, असे सांगून पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. 

सावंतवाडी - जिल्ह्यात असलेल्या नारायण राणेंच्या एकतर्फी प्राबल्याला धक्का देण्यासाठी कोणत्याही पक्षांत जा, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला त्या वेळी दिला होता. चांगले कार्यकर्ते आपल्या पक्षात यावेत, असे सर्वांनाच वाटते; परंतु आता व्यक्तिगत स्पर्धेपेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे. यामुळे अन्य पक्षांत जाण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही, असे सांगून पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. 

या वेळी राणे आपल्याला विधान भवनात भेटले ते ज्येष्ठ नेते आहेत. माझे चांगले भाषण झाल्यानंतर ते माझे भर सभागृहात कौतुक करतात हे उघड आहे. यामुळे माझ्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला. याचा वेगळा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असेही केसरकर यांनी सांगितले. श्री. केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या वेळी शहर प्रमुख शब्बीर मणीयार उपस्थित होते. 

श्री. केसरकर यांना तुम्ही भाजपात प्रवेश करणार, अशी विरोधकांकडून ओरड सुरू आहे. याबाबत त्यांना छेडले असता ते म्हणाले, ‘‘मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेने मला पालकमंत्रिपद दिले. मंत्री केले आहे. यामुळे आता मी कट्टर शिवसैनिक झालो आहे. त्यामुळे कोणी अशा प्रकारचा आरोप करीत असेल ते चुकीचे आहे. राहिली गोष्ट प्रवेशाची. विधानसभा निवडणुकीपूर्वी या ठिकाणी राणे हेच शिवसेनेचे विरोधक होते आणि आपण त्यांच्या विरोधात दहशतवादाची लढाई सुरू केली होती. अशा परिस्थितीत त्यांचा पाडाव करण्यासाठी मी कोणत्याही पक्षात जावे, असे खुद्द उद्धव ठाकरे यांनी मला सांगितले होते; परंतु गरिबांसाठी काम करणारा पक्ष म्हणून मी शिवसेनेचा पर्याय स्वीकारला होता. आणि आता तर मी मंत्री आहे. यामुळे कोण टीका करीत असेल तर ती निरर्थक आहे.’’ राणेंनी केसरकर यांच्या खांद्यावर हात ठेवला होता याबाबत श्री. केसरकरांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘राणे हे सभागृहाचे वरिष्ठ नेते आहेत. ते मला ज्येष्ठ आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. याचा चुकीचा राजकीय अर्थ काढला गेला. मी सभागृहात चांगले भाषण केले, चांगले मुद्दे मांडले, तर ते उघडपणे माझेही कौतुक करतात. याचा अर्थ वेगळा लावण्याची गरज नाही. आमदार वैभव नाईक यांनी माझ्याबद्दल केलेले विधान सहज होते. त्याचा वेगळा अर्थ घेण्याची गरज नाही.’’
 

ते पुुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ आणि देवगड या चार पंचायत समितीत युतीचा सभापती असणार आहे. वैभववाडीत समांतर परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही त्याबाबत फॉर्म्युला ठरविण्याचे अधिकार स्थानिक कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे. युती झाली असती तर जिल्ह्यातले चित्र आज वेगळे दिसले असते.’’

संघटनेत ढवळाढवळ नाही 
या वेळी श्री. केसरकर यांना जिल्ह्यातील संघटनावाढीसाठी आवश्‍यक ते प्रयत्न होताना दिसत नाही, असा प्रश्‍न केला असता मी शासनाचा एक मंत्री आहे. त्यामुळे मी संघटनेत ढवळाढवळ करणार नाही. पक्षाचा तसा नियम आहे. आणि तशी माझ्याकडे जबाबदारी द्यायची असल्यास पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील.’’

Web Title: No question to other parties