ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सेतू कार्यालय बंद

अमित गवळे
सोमवार, 14 मे 2018

सुधागड तालुक्यात नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशीच सर्वर डाउन झाल्याने उमेदवारांना आपले अर्ज भरता आले नाही. त्यात शेवटच्या दिवशी सेतु कार्यालय बंद असल्यामुळे देखील उमेदवारांची मोठी गैरसोय झाली. उमेदवारांनी या सर्व गैरसोइबद्दल मोठा असंतोष व्यक्त केला आहे.

पाली : सुधागड तालुक्यातील 14 ग्रामपंचयतींच्या निवडणुका रविवारी ( ता.27) होत आहेत. यासाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख शनिवारी (ता.12) होती. मात्र शनिवारी तहसील कार्यालयातील सेतु कार्यालय बंद होते. परिणामी प्रतिज्ञापत्र मिळवितांना उमेदवारांची मोठी तारांबाळ उडाली. 

सुधागड तालुक्यात नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशीच सर्वर डाउन झाल्याने उमेदवारांना आपले अर्ज भरता आले नाही. त्यात शेवटच्या दिवशी सेतु कार्यालय बंद असल्यामुळे देखील उमेदवारांची मोठी गैरसोय झाली. उमेदवारांनी या सर्व गैरसोइबद्दल मोठा असंतोष व्यक्त केला आहे. नामनिर्देशन पत्र भरतांना उमेदवारांना आपल्या नावात काही बदल असेल किंवा इतर कारणांसाठी प्रतिज्ञापत्र करावे लागते. हे प्रतिज्ञापत्र सेतु कार्यालयातून उपलब्ध होते. मात्र शनिवारी (ता. 12) येथील सेतु कार्यालयाला टाळे होते. यावेळी तिथे उपस्थित अनेक जणांनी तहसील कार्यालयात विचारणा केल्यावर सेतु कार्यालयातील कर्माचारी सुट्टीवर गेल्याचे समजले. यावेळी तिथे उपस्थित विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवार या संदर्भात तहसिलदार बि. एन. निंबाळकर यांना फोन लावत होते. काहींनी सेतु कार्यालयाच्या ठेकेदाराला देखील फोन लावून विचारणा केली.

अखेर सेतु कार्यालयाची चावी मिळवून तहसिलदार निंबाळकर यांनी एक तहसील कार्यालयातील कर्मचारी व शिपाई यांना सेतु कार्यालयात प्रतिज्ञापत्र नोंद करण्यासाठी व देण्यासाठी नियुक्त केले. त्यानंतर उमेदवारांची कामे झाली. व त्यांना नामनिर्देशन पत्र अखेरच्या क्षणाला भरता आले. तो पर्यंत मात्र उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांचा जिव मुठीत आला होता. या संदर्भात सकाळने तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांना सोमवारी (ता.14) भ्रमणध्वनी वर संपर्क करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा निंबाळकर यांनी मी ट्रेनिंगला असल्याचे सांगितले.

निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे तहसील कार्यालयातील महत्वाचे  सेतु कार्यालय बंद असणे ही खूप गंभीर बाब आहे. त्यामुळे अनेकांची मोठी गैरसोय झाली.  आईचा नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी प्रतिज्ञापत्र तयार करायचे होते. मात्र सेतु कार्यालय बंद असल्याने खूप धावपळ उडाली. अखेरच्या क्षणाला प्रतिज्ञापत्र मिळाले जर, ते मिळाले नसते तर आईला नामनिर्देशन पत्र भरता आले नसते. त्यामुळे निवडणूक लढविण्यास मुकावे लागले असते. या संदर्भात सेतु कार्यालयाच्या ठेकेदारवर व कर्मचाऱ्यांवर करवाई होणे गरजेचे आहे.
- सुशिल शिंदे, पाली, ग्रामपंचायत उमेदवाराचे नातेवाईक.

Web Title: nomination file in grampanchayat election