माथेरानच्या जंगलात वृद्धाला जीवदान 

संतोष पेरणे
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

नेरळ - माथेरानमधील जंगलात रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत पडलेल्या ६६ वर्षांच्या व्यक्तीला स्थानिक नागरिकाची सतर्कता व पोलिसांनी तत्काळ केलेल्या हालचालींमुळे जीवदान मिळाले. महत्प्रयासाने त्यांची ओळख पटवून कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.

नेरळ - माथेरानमधील जंगलात रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत पडलेल्या ६६ वर्षांच्या व्यक्तीला स्थानिक नागरिकाची सतर्कता व पोलिसांनी तत्काळ केलेल्या हालचालींमुळे जीवदान मिळाले. महत्प्रयासाने त्यांची ओळख पटवून कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.

सीताराम भोसले हे सोमवारी रात्री ८ च्या सुमारास अलेक्‍झांडर पॉईंट येथील रस्त्याने जात असताना जवळच जंगलात त्यांना ही वृद्ध व्यक्ती मूर्च्छित होऊन पडलेली दिसली. त्यांनी वेळ न दवडता पोलिसांना फोनवर ही माहिती दिली. या वृद्धाच्या अंगावर मुंग्या चढल्या होत्या. त्यामुळे ही व्यक्ती मरण पावली की काय, अशी शंका पोलिसांना वाटली. त्यांच्या तोंडावर पाणी मारले असता थोडी हालचाल दिसली. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ झोळी बनवून या व्यक्तीला माथेरानमधील बी. जे. रुग्णालयात आणले. तेथील डॉ. तांबे यांनी या वृद्धाला तपासून तातडीने जे. जे. रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. पोलिसांनी १०८ क्रमांकावर फोन लावून रुग्णवाहिका बोलावली. त्यातून या व्यक्तीला जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. महत्प्रयासाने या व्यक्तीचे नाव-गाव शोधण्यात पोलिसांना यश आले. या कामी माथेरान पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर, उपनिरीक्षक राजवर्धन खेबुडे, पोलिस नाईक रूपेश नागे, कौशिक फेंगडू, पोलिस शिपाई बाबासाहेब जाधव, अण्णासाहेब मेटकरी, दत्तात्रय किसवे यांनी आपले कर्तव्य बजावले व माणुसकीचा प्रत्यय दिला. 

भोसले यांनी ‘सकाळ’ला सांगितले की, बाजारपेठेतून घरी परतताना रस्त्याच्या कडेला पडलेली ही व्यक्ती पाहून आपण आधी घाबरलो; पण पोलिसांना फोन केल्यावर ते १० मिनिटांतच तेथे पोहोचले. सहायक पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर म्हणाले की, रात्री ८ वाजून पाच मिनिटांनी सीताराम भोसले यांचा फोन आल्यावर मी व माझे सहकारी घटना स्थळी गेलो. ही व्यक्ती गंभीर अवस्थेत होती. थोडी मानसिक तणावातही होती. आता त्यांच्या मुलाला बोलावून त्यांच्या स्वाधीन केले आहे.

अशी पटली ओळख 
शुद्ध हरपलेल्या या व्यक्तीच्या कुटुंबाचा शोध घेणे पोलिसांना कठीण झाले होते. पोलिसांनी माथेरानमधील हॉटेलांमध्ये चौकशी केली असता ही व्यक्ती बाईक हॉटेलमध्ये लेखापाल म्हणून चार वर्षे काम करीत होती. ती सध्या पॅरामाऊंट हॉटेलमध्ये कामास आहे, अशी माहिती हाती आली. गिरीश त्रिकमदास रावसिया असे या वृद्धाचे नाव असून ते बदलापूरचे असल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: old man in Matheran's forest