वायंगणीत 14 एप्रिलपासून कासवजत्रा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

वेंगुर्ले - ऑलिव्ह रिडले ही कासवांची दुर्मिळ प्रजाती देशात ओडिशा, गोवा आणि कोकणात आढळते. त्यांची पैदास डिसेंबर ते मार्च या कालावधीत होते. त्यानिमित्ताने मऊशार वाळूवर स्वच्छंदीपणे धावणारी कासवांची पिल्ले, समुद्राच्या लाटांवर हेलकावे घेण्यासाठी सुरू असलेली त्यांची पळापळ, कासवांच्या लिलांचे दर्शन "याचि देही याचि डोळा' घेण्याची संधी निसर्गप्रेमी पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. निमित्त आहे वायंगणी येथे 14 ते 16 एप्रिल दरम्यान होणाऱ्या कासवजत्रेचे. 

कासवांच्या अंड्यांपासून बनवलेल्या पदार्थांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये खूप मागणी असते. त्यामुळे अंडी चोरीला जाऊ नयेत, तसेच कुत्रे किंवा अन्य प्राण्यांपासून त्यांचे भक्षण होऊ नये म्हणून सुहास तोरसकर आणि त्यांचे सहकारी या अंड्यांची विशेष काळजी घेतात. अंडी ज्या ठिकाणी घातली आहेत तिथे जाळं बसवतात आणि 55 ते 60 दिवसांनी पिल्लं बाहेर आल्यावर त्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली समुद्रात सोडले जाते. यावर्षी जत्रेच्या पहिल्या दिवशी तज्ज्ञ अभ्यासक प्रा. नागेश दप्तरदार हे स्लाइड शो व फिल्मच्या माध्यमातून माहिती देणार आहेत. समुद्रातील जैवविविधता अनुभवण्यासाठी महाविद्यालयीन तसेच विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

वायंगणीच्या ग्रामस्थांनी किरात ट्रस्ट आणि लुपीन फाउंडेशनच्या सहकार्याने भरवलेल्या या जत्रेत कासवांच्या पिल्लांच्या जन्मसोहळ्याचा आनंद लुटता येईल. याच्याबरोबरीने वायंगणी किनाऱ्यावरची डॉल्फिन सफर, खाडीतील मासेमारीचा अनुभव, वायंगणी-कोंडुरा जंगल ट्रेल, कासव संवर्धनाचे फिल्म शो, प्राणी-पक्षी तज्ज्ञांशी गप्पा, खाडीतील सफर, दशावतार, स्थानिक कला संस्कृती दर्शविणारे कलादालन, अस्सल मालवणी पदार्थांची मेजवानी, असे कार्यक्रम या कासव जत्रेच्या निमित्ताने घेण्यात येणार आहेत. वायंगणी ग्रामस्थांच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाचे हे 6 वे वर्ष आहे. 3 दिवसांच्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शशांक मराठे यांच्याशी संपर्क साधावा. 

Web Title: Olive Ridley