esakal | सह्याद्रीच्या रांगांमध्ये वाघाची डरकाळी; ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये वाघाची शिकार क्लिक

बोलून बातमी शोधा

सह्याद्रीच्या रांगांमध्ये वाघाची डरकाळी; ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये वाघाची शिकार क्लिक
सह्याद्रीच्या रांगांमध्ये वाघाची डरकाळी; ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये वाघाची शिकार क्लिक
sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : सह्याद्रीच्या रांगांमध्ये पुन्हा एकदा व्याघ्रदर्शन झाले आहे. पर्यावरणप्रेमींसाठी हा सुखद धक्‍का आहे. म्हादई (गोवा) येथील अभयारण्यात झालेल्या विषप्रयोगानंतर चार वाघांचे कुटुंब मृत्युमुखी पडले होते, त्यानंतर दीड वर्षाने हे सुखद वास्तव्य पुढे आले आहे.

सह्याद्रीच्या रांगांमध्ये वाघाचा कॉरिडॉर आहे. साधारण दांडेली (कर्नाटक) - उत्तर गोव्यातील म्हादई अभयारण्य - तिलारी (सिंधुदुर्ग) - राधानगरी - विशाळगड - जोरजांभळी - महाबळेश्‍वर असा हा लांबलचक व्याघ्र भ्रमण मार्ग आहे. यात सिंधुदुर्गातील आंबोली ते मांगेली हा संवेदनशील भाग आहे. याच्या संवर्धनासाठी उच्च न्यायालयात वनशक्‍ती या संस्थेने याचिकाही दाखल केली आहे. या मार्गामध्ये गेल्या अनेक वर्षात बैल, म्हैस, गाय अशा मोठ्या प्राण्यांची शिकार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शक्‍यतो या प्राण्यांची वाघच शिकार करतो; मात्र त्याच्या वास्तव्याबाबत वन विभाग मौन बाळगतो.

हेही वाचा- कोरोनाकाळात ठरेल तुमच्यासाठी संजीवनी; घरीच मिळवा आता ऑक्‍सिजन; लावा ही झाडे

2009 मध्ये मात्र सावंतवाडी वन विभागाने सह्याद्रीच्या रांगांमध्ये वाघाचा संचार असल्याचे उघड मान्य केले होते. तुलनेत तिलारीलगत असलेल्या गोव्यातील वनक्षेत्रामध्ये वाघ असल्याचे पुरावे वेळोवेळी तेथील वन खात्याने पुढे आणले. सिंधुदुर्गात वाघाच्या पाऊलखुणा दिसल्याचे किंवा त्याचे दर्शन झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या. गेले वर्ष-दीड वर्ष मात्र वाघाच्या संचाराबाबत फारशा हालचाली नव्हत्या.

गेल्या आठवड्यात सिंधुदुर्गातील एका गावात गायीवर वन्य प्राण्याचा हल्ला झाल्याची घटना घडली. स्थानिकांनी हा हल्ला वाघाने केल्याचा दावा केला. वन विभागाने याबाबत ठोस पुरावा नसल्याचे सांगितले; मात्र त्यानंतर चारच दिवसात ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये वाघ शिकार झालेल्या गायीसोबत असल्याचे एक छायाचित्र समाजमाध्यमात व्हायरल झाले. ते सह्याद्रीच्या रांगांमधील शिकार झालेल्या ठिकाणचे असल्याचा दावा करण्यात आला. स्थानिक वनाधिकाऱ्यांनी तो फेटाळला; मात्र सर्वसाधारणपणे सुरक्षेच्या कारणास्तव वाघाचे लोकेशन उघड केले नाही. याचवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश असलेल्या कोल्हापूर वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक क्‍लेमेंट बेन यांनी व्टिट करून एक छायाचित्र आणि नुकत्याच जाहीर झालेल्या कंझर्व्हेशन रिझर्व्हमध्ये वाघ कॅमेऱ्यात ट्रॅप झाल्याची सुखद पोस्ट केली. त्यामुळे सह्याद्रीच्या रांगांमध्ये वाघाचे अस्तित्व पुन्हा अधोरेखित झाले.

म्हादई येथे 5 जानेवारी 2020 ला वाघाचे कुटुंब विषप्रयोगाने मृत्युमुखी पडल्याच्या घटनेआधी गोव्याच्या वन विभागाच्या कॅमेऱ्यात पाच वाघांचे वास्तव्य असल्याचे छायाचित्र ट्रॅप झाले होते. 2015-16 पासून पाच वाघांचे हे कुटुंब वन विभागाच्या निरीक्षणाखाली होते. मार्च 2018 मध्ये चांदोली अभयारण्यात ते कॅमेऱ्यात दिसूनही आले होते. अलीकडे 24 मार्चला म्हादईच्या जंगलात एक वाघ आढळला होता. तो हाच वाघ असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सर्वसाधारणपणे वाघाचे लोकेशन उघड केले जात नाही.

सह्याद्रीच्या रांगांमध्ये वाघाचे निश्‍चितच वास्तव्य आहे. त्याचे प्रमाण कमी जास्त असू शकेल; मात्र त्याला वाचवणे, संरक्षण करणे अत्यावश्‍यकच आहे. यासाठी त्याचा अधिवास वाचवायला आणि वाढवायला हवा. ही फक्‍त वन विभागाचीच नाही तर सगळ्यांचीच जबाबदारी आहे.

-भाऊ काटदरे, सह्याद्री निसर्ग मित्र संस्था, चिपळूण

सह्याद्री पट्ट्यातील व्याघ्र संवर्धन क्षेत्रामध्ये वाघाचे अस्तित्व आहे. वन विभागाच्या वतीने लावलेल्या कॅमेऱ्यात मिळालेल्या छायाचित्रातून ते सिद्ध झाले आहे; मात्र त्याचे लोकेशन सांगता येणार नाही. या वाघाच्या संवर्धनासाठी येत्या काळामध्ये सर्व जंगलात पाणी व अन्न मिळण्याच्या दृष्टीने मृदा व जलसंधारण अंतर्गत बंधारे व पाणवठे बांधण्यात येणार आहेत. गावागावातील वन समितीच्या मदतीने अशा वनक्षेत्रात प्रवेश देण्याबाबत कडक नियम लागू करण्यात येतील.

-शहाजी नारनवर, उपवनसंरक्षक, सिंधुदुर्ग

Edited By- Archana Banage