...त्यामुळे चिपळूणात दीड दिवसाच्या गणेश विसर्जनावेळी टळली गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

मोठमोठी मंडळे आणि गृहनिर्माण संस्थांनीदेखील यंदा दीड दिवसातच गणेशोत्सव आटोपता घेतला.

चिपळूण - कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर चिपळूण पालिकेने "विसर्जन आपल्या दारी' या मोहिमेअंतर्गत महत्त्वाच्या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले. शहरामध्ये फिरून गाडीतून गणेशमूर्ती गोळा केल्या. चिपळूण पालिकेच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला. या उपक्रमामुळे विसर्जन ठिकाणी होणारी संभाव्य गर्दी टाळण्यात पालिकेला यश आले. 
ना ढोल-ताशांचा गजर, ना गुलालाची उधळण, ना फटाक्‍यांची आतषबाजी, ना भलीमोठी मिरवणूक. कोरोनाच्या सावटामुळे शनिवारी अतिशय शांततेत भक्तांच्या घरी दाखल झालेल्या श्रीगणेशाला दीड दिवसाच्या आदरातिथ्यानंतर रविवारी निरोप देण्यात आला. 

कोरोनाचे संकट दूर ठेवण्यासाठी अनेक कुटुंबांनी घरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याला प्राधान्य दिले, तर मोठमोठी मंडळे आणि गृहनिर्माण संस्थांनीदेखील यंदा दीड दिवसातच गणेशोत्सव आटोपता घेतला. गणेशोत्सवाचा चिपळूण शहरात एक सोहळा असतो; मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटाने या उत्सवाला झाकोळून टाकले आहे. टाळेबंदीमुळे नोकरदारांपासून उद्योजकांपर्यंत साऱ्यांवरच ओढवलेले आर्थिक संकट, कोरोनाची भीती आणि सरकारी निर्बंध या कारणांमुळे यंदा गणेशोत्सवाचा डामडौलच दिसेनासा झाला आहे. अनेक कुटुंबे, गृहनिर्माण संस्था तसेच सार्वजनिक मंडळांनी यंदा गणेशोत्सवच रद्द केला, तर उर्वरित भक्तांनीही अतिशय शांततेत आणि साध्या वातावरणातच शनिवारी गणरायाची प्रतिष्ठापना केली. रविवारी त्याच साधेपणाने दीड दिवसाच्या गणेशाला निरोपही दिला. दरवर्षी घरगुती गणेश विसर्जनालाही वाशिष्ठी किनारी हजारोंची गर्दी उसळते. 
  
वाशिष्ठी किनाऱ्यावर येण्यापासून मज्जाव 
यंदा मात्र वाशिष्ठीचा किनारा निवांत होता. वाशिष्ठी नदी किनाऱ्यावर नागरिकांना येण्यापासून मज्जाव केल्याने भाविकांना मूर्ती पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडेच सुपूर्द कराव्या लागल्या. पालिका प्रशासनाने वेगवेगळ्या भागांत कृत्रिम तलावांची उभारणी करून तेथे विसर्जन करण्याच्या सूचना केल्या होत्या. 

हे पण वाचा - केवळ दीडशे रूपयांसाठी गड्याने काय केले वाचा

  
भाविकांनी दिला प्रतिसाद 
अनेक कुटुंबांनी घरातच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास प्राधान्य दिले. यंदा अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जनही रविवारीच करण्यात आले. 200हून अधिक भाविकांनी आपल्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी पालिकेकडे दिल्या. भाविकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, कार्यालय प्रमुख अनंत मोरे यांनी आभार मानले आहेत. 

हे पण वाचादेशप्रेम लागले ओसरू ! स्वस्तातील चिनी वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one and half day Ganesh Visarjan in chiplun