लाखाचे झाले बारा हजार ; मॅच्युरिटीनंतर मिळाली फक्त निम्मीच रक्कम, कुठे घडली घटना ?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

इतरांची फसवणूक थांबविण्यासाठी त्यांनी डीवायएसपी यांच्याकडे तक्रार केली.

रत्नागिरी : चुकीची विमा पॉलिसी माथी मारत विमा एजंट आणि डेव्हलपमेंट ऑफिसरने एका ग्राहकाची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. लाखाचे बारा हजार करणे, या म्हणीप्रमाणे विमा एजंटने पॉलिसीधारकाला चुना लावला. अकरा वर्षांनंतर २ लाख रुपये मिळणाऱ्या पॉलिसीला फक्त ५५ हजार देऊन त्याची बोळवण केली. इतरांची फसवणूक थांबविण्यासाठी त्यांनी डीवायएसपी यांच्याकडे तक्रार केली.

हेही वाचा - तरीही त्या कोरोना रुग्णांना भेटतात आणि दिलासा देतात ; कोकणात अशाही एक कोरोना योद्धा 

 

तालुक्‍यातील साखरतर येथे हा प्रकार घडला. अजय प्रसादे असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शहरात पिग्मी एजंट म्हणून ते अनेक वर्षे कार्यरत आहेत. भविष्याची सुरक्षित तरतूद म्हणून त्यांना एका विमा एजंट व त्या नामांकित कंपनीच्या डेव्हलपमेंट ऑफिसरने एक विमा पॉलिसी दिली. दरवर्षी ९ हजार ५०० रुपये भरा आणि ११ वर्षांनंतर २ लाख रुपये मिळतील, अशी ही पॉलिसी होती. प्रसादे यांनी त्यावर विश्‍वास ठेवत ही पॉलिसी घेतली. या नामांकित कंपनीवर विश्‍वास ठेवत प्रसादे यांनी आपल्या पिग्मी व्यवसायातून मिळणाऱ्या मानधनातून विम्याचे हप्ते नियमित भरण्यास सुरवात केली.

अकरा वर्षांनंतर त्या पॉलिसी मॅच्युरिटीची रक्कम आणायला गेले तर अजय प्रसादे यांना धक्काच बसला. आजवर प्रसादे यांनी विमा हप्त्याच्या स्वरूपात तब्बल १ लाख ५ हजार रुपये भरले होते; मात्र मॅच्युरिटीनंतर आता तुम्हाला फक्त ५५ हजार मिळतील, असे विमा कंपनीकडून सांगण्यात आले. 
दोन लाख रुपये मिळणार, या अपेक्षेने गेलेल्या प्रसादे यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

हेही वाचा -  शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकार लक्ष्य, कृषी समिती सभा वादळी

 

भरलेल्या एकूण रकमेत वाढ सोडा, तर निम्मीच रक्कम मिळत होती. पॉलिसीबाबत चुकीची माहिती देऊन एजंट व डेव्हलपमेंट ऑफिसरने आपली फसवणूक केल्याचे प्रसादे यांचे म्हणणे आहे. त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिस उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्याकडे त्यांनी तक्रार केली व दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. अशाप्रकारे भविष्यात आणखी कोणी बळी पडू नये, म्हणून मी कायदेशीर लढाई लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one customer baer fraud from a any policy agents in ratnagiri