esakal | धक्कादायक ; अशी काढली पोस्टमास्तरने मृत व्यक्तींच्या खात्यावरील रक्कम
sakal

बोलून बातमी शोधा

one post man duplicate signature of your dead account holder and money withdraw from post account in ratnagiri

मृत पावलेल्या या लाभार्थी खातेदारांची संख्या मोठी असल्याचे बोलले जात आहे.

धक्कादायक ; अशी काढली पोस्टमास्तरने मृत व्यक्तींच्या खात्यावरील रक्कम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या पोस्टातील बचत खात्यात दरमहा शासनाकडून मदत जमा होत असते; मात्र मृत पावलेल्या काही लाभार्थ्यांच्या खात्यातून लाभार्थ्यांच्या बनावट सह्या करून रक्‍कम काढण्याचा पराक्रम दापोली तालुक्‍यातील एका पोस्टमास्तरने केल्याची तक्रार करण्यात आली. याला रत्नागिरी येथील डाकघर अधीक्षकांनी दुजोरा दिला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

हेही वाचा - रत्नागिरीत हे तालुके बनत आहेत कोरोना हॉटस्पॉट 

दापोली तालुक्‍यातील एका पोस्टमास्तरने संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या पोस्टात असलेल्या बचत खात्यापैकी ज्या लाभार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, अशांच्या बचत खात्यातून लाभार्थ्यांची बनावट सही करून पैसे काढले आहेत. मृत पावलेल्या या लाभार्थी खातेदारांची संख्या मोठी असल्याचे बोलले जात आहे. रत्नागिरी येथील डाकघर अधीक्षकांकडे या संदर्भात तक्रार केल्यावर रत्नागिरी येथील दोन निरीक्षकांनी या संदर्भात या पोस्टात येऊन चौकशीही केली. या सर्व प्रकारामुळे आता या पोस्ट कार्यालयात खाती असलेल्या या योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात दरमहा शासनाकडून जमा होणारी रक्‍कम काढता येत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी व आम्हाला आमच्या खात्यातील पैसे मिळावेत, अशी मागणी लाभार्थी करत आहेत. 

या प्रकरणाची चौकशी कूर्म गतीने होत असून, या संदर्भात रत्नागिरीचे डाकघर अधीक्षक यांनी असा प्रकार घडला असल्याचे मान्य केले. संबंधित पोस्टमास्तर रजेवर असल्याचे सांगून या संदर्भात कोणतीही अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार देत, अधिक माहिती गोवा विभागाचे रिजनल ऑफिसर यांच्याकडून घ्या, असे सांगितले; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या प्रकरणी कोणतीही तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल झालेली नसल्याची माहिती दापोलीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

हेही वाचा - रात्रीस खेळ चाले म्हणत, कोकणात यांनी मांडलाय उच्छाद ; तोंडचा घास घेत आहेत हिरावून

पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार

पोस्टाचे जिल्हास्तरीय अधिकारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून या पोस्टमास्तरला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची शंका लाभार्थ्यांनी व्यक्त केल्यावर मुर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते विनय जोशी यांनी या प्रकरणाची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे केली. ही तक्रार अधिक चौकशीसाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्याकडे पाठविली असल्याचे  जोशी यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

loading image