पाडव्यादिवशी अवघ्या ४३ हजार हापूस पेट्या वाशीत

राजेश कळंबटे
रविवार, 7 एप्रिल 2019

एक नजर

  • आतापर्यंतच्या हंगामात गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हापूसच्या अवघ्या ४३ हजार पेट्याच वाशी मार्केटमध्ये दाखल
  • गेल्या दहा वर्षांतील हा नीचांक
  • दरवर्षी एक लाखाहून अधिक पेट्या होतात वाशी फळ बाजारात दाखल
  • गेल्या वर्षीपेक्षा यंदा निम्म्याच पेट्या
  • पेटीचा दर १२०० ते चार हजार रुपयांपर्यंत

रत्नागिरी - वातावरणातील परिणामांमुळे आतापर्यंतच्या हंगामात गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर हापूसच्या अवघ्या ४३ हजार पेट्याच वाशी मार्केटमध्ये दाखल झाल्या. गेल्या दहा वर्षांतील हा नीचांक आहे. परंपरेप्रमाणे कोकणातील बागायतदार हापूस तोडून बाजारात विक्रीसाठी या मुहूर्तावर आणतात. दरवर्षी एक लाखाहून अधिक पेट्या वाशी फळ बाजारात दाखल होतात. गेल्या वर्षीपेक्षा यंदा निम्म्याच पेट्या गेल्या. पेटीचा दर १२०० ते चार हजार रुपयांपर्यंत आहे.

यंदा उत्पादन घटल्यामुळे मुंबई, पुणे, सुरत, अहमदाबादसह स्थानिक व्यापाऱ्यांनाही फटका बसला आहे. दर अधिक असल्याने मालाला उठाव कमी आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक डझन हापूसची तरी पेटी खरेदी केली जाते. कोकणातील बहुतांश बागायतदार हा मुहूर्त साधतात. आवकच कमी असल्यामुळे दरही वधारले आहेत. त्यामुळे एप्रिलमध्येही हापूसची चव चाखणे सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर आहे. १ ते ५ मार्च २०१९ या कालावधीत दोन लाख पेट्यांची आवक झाली. तीच गतवर्षी १ ते ८ मार्च दरम्यान पाच लाख १३ हजार ३९३ इतकी होती.

पाडव्याच्या दिवशी कोकणातून ४३ हजार ३७४ पेट्या आणि अन्य भागातून १५ हजार ६०९ पेट्यांची आवक फळमार्केटमध्ये झाली. मुंबईसह उपनगरांत १० हजार किरकोळ व्यापारी असून एपीएमसीतील ६०० पेटी हापूसची घाऊक खरेदी होते. प्रतिकिलोला केसर १०० ते १५० रुपये, बदामी ६० ते ८०, लालबाग ६० ते ७०, तोतापुरी ३० ते ५०, कर्नाटक आंबा ९० तर १४० किलोने विकला जातोय. हापूस मानांकनामुळे बाहेरील आंबा हापूसच्या नावाखाली विकणाऱ्यांची पंचाईत झाली आहे.

गुढीपाडव्यामुळे नवी मुंबईच्या बाजार समितीत चांगली आवक अपेक्षित होती; परंतु उत्पादनात घट असल्याने तुलनेत कमी पेट्या आल्या. १९१० नंतर अशी वेळ प्रथमच आली आहे. आज ७ ते ८ कोटींची उलाढाल अपेक्षित होती.
- संजय पानसरे,
बाजार समिती, वाशी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: only 43 thousand boxes Mango in Washi Market on Gudipadwa