ईबीसीसाठी खुल्या वर्गाची कसरत

तुषार सावंत : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

कणकवली - विविध मागण्यांसाठी राज्यभर निघालेल्या मराठा क्रांती मूकमोर्चाचे वादळ शमविण्यासाठी राज्याने मान्यताप्राप्त व्यावसायिक व उच्च शिक्षण अभ्यासक्रमात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू केली; मात्र याच्या अटी आणि शर्तीमुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत होणार आहे.

कणकवली - विविध मागण्यांसाठी राज्यभर निघालेल्या मराठा क्रांती मूकमोर्चाचे वादळ शमविण्यासाठी राज्याने मान्यताप्राप्त व्यावसायिक व उच्च शिक्षण अभ्यासक्रमात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू केली; मात्र याच्या अटी आणि शर्तीमुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत होणार आहे.

सवलतीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करावे लागणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "राजर्षी छत्रपती शाहू महाराज राज्य शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना' जाहीर केली. याचा अध्यादेश राज्यशासनाने 13 ऑक्‍टोबरला काढला. खुल्या प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी ही योजना लागू झाली आहे. विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न सहा लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना विनाअनुदानीत महाविद्यालये, शासन मान्यताप्राप्त तंत्रनिकेतनमध्ये केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेमार्फत प्रवेश घेतलेल्यांना ही योजना लागू केली जाणार आहे.

नव्या शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेंतर्गत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सहा लाखांपर्यंत असलेल्या विद्यार्थ्याला लाभ मिळणार आहे. खाजगी विनाअनुदानीत संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्यांचा कल वाढल्याने विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. मात्र, ही योजना निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 2016-17 या शैक्षणिक वर्षासाठी लागू केली आहे. ज्या लाभार्थी विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख 50 हजार ते सहा लाखांपेक्षा कमी आहे ते विद्यार्थी पदवी, पदव्युत्तर पदवी, बारावी तसेच दहावीनंतरच्या पदविका परीक्षेसाठी एकत्रित किमान 60 टक्केपेक्षा अधिक गुण मिळविणे बंधनकारक आहे. ईबीसीधारक विद्यार्थ्यांकरीता 1 लाख ते 2 लाख 50 हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या कुुटुंबातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनाही लागू करण्यात आली आहे. अल्पभूधारक शेतकरी आहेत, नोंदणीकृत मजूर आहेत अशा विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजनाही सुरू आहे. महानगराअंतर्गत प्रतिमहा तीन तर अन्य ठिकाणी प्रवेश घेतलेल्यांना प्रतिमहा दोन हजार रुपये दहा महिन्यांकरीता दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेत स्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावे. कॅपद्वारे जी प्रवेश प्रक्रिया झाली त्या वेळच्या अर्जाचा आयडी आणि पासवर्ड वापरावयाचा आहे. अर्ज सादर केल्यानंतर शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती लाभार्थींची यादी संकेत स्थळावर जाहीर केली जाणार आहे.

काय आहेत अटी?
* विद्यार्थी नियमित उपस्थिती आवश्‍यक
* एटीकेटी असल्यास सवलतीस अपात्र
* शैक्षणिक प्रगती आणि वर्तणूक तपासणार
* प्रत्येक सत्राची परीक्षा आवश्‍यक
* अभ्यासक्रम सोडल्यास होणार वसुली
* प्राधिकरणाने निश्‍चित केलेले शिक्षण शुल्क ग्राह्य
* संस्थांकडून मूल्यांकन व दर्जा मानांकन आवश्‍यक

Web Title: Open category students fight for EBC