वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीस विरोध, प्रसंगी उपोषणाचा इशारा

भूषण आरोसकर
Sunday, 6 September 2020

परब म्हणाले, येथील डॉ. चितारी यांची ओरस येथे बदली झाल्याचा आदेश आज प्राप्त झाला आहे. त्याला स्वतः डॉ. चितारी यांनी दुजोरा दिला. ही बदली चुकीची असून डॉ. चितारी यांच्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयाला आधार आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अभिजीत चितारी यांची ओरस येथे झालेली बदली तत्काळ रद्द करावी, अन्यथा उपोषणाला बसेन, असा इशारा नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिला. 
नगराध्यक्ष परब यांनी याबाबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

परब म्हणाले, येथील डॉ. चितारी यांची ओरस येथे बदली झाल्याचा आदेश आज प्राप्त झाला आहे. त्याला स्वतः डॉ. चितारी यांनी दुजोरा दिला. ही बदली चुकीची असून डॉ. चितारी यांच्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयाला आधार आहे. रात्री-अपरात्री रुग्ण सेवेसाठी ते नेहमी तत्पर असतात. कोरोना काळातही त्यांची कामगिरी चांगली आहे; मात्र अद्यापही कोरोनाचे संकट टळले नसताना आणि त्यांची येथील उपजिल्हा रुग्णालयाला गरज असताना, बदली करण्याचा हेतू काय? त्यामुळे प्रशासनाने त्यांची बदली रद्द करावी, अन्यथा उपोषणाला बसू.

येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉ. चितारी तसेच डॉ. ज्ञानेश्‍वर दुर्भाटकर, डॉ. राजेश गुप्ता यांच्यामुळे येथील रुग्णसेवा सुरळीत आहे. उपजिल्हा रुग्णालयात चांगली सेवा देणाऱ्या डॉक्‍टरला प्रशासन अन्यत्र का हलवित आहे? ही बदली रद्द न झाल्यास गप्प बसणार नाही.'' 

बदलीत मोठे षड्‌यंत्र - सांगेलकर 
शहरासह संपूर्ण तालुक्‍यातील गोर गरीब जनतेसाठी देवदूत म्हणून उभे असलेले येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी तथा हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अभिजित चितारी यांच्या तडकाफडकी केलेल्या बदलीत मोठे षड्‌यंत्र आहे. राजकीय आकसापोटी त्यांची बदली करण्यात आली असून त्यांचा तालुका कॉंग्रेसच्यावतीने निषेध करत असल्याचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी सांगितले. ही बदली तत्काळ रद्द करावी, अन्यथा तालुका कॉंग्रेस जनआंदोलन करेल, असा इशाराही दिला आहे. 

डॉ. चितारी यांची जिल्हापातळीवर बदली झाली असून याबाबत शहरातून नाराजी व्यक्त होत आहे. कॉंग्रेसच्यावतीने या बदलीबाबत तालुकाध्यक्ष सांगेलकलर यांनी भूमिका स्पष्ट केली. या बदली संदर्भात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे लक्ष वेधणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. डॉ. चितारी हे दिवसरात्र आपल्या आरोग्याची पर्वा न रुग्णसेवा देत असतात. त्यांची तालुक्‍यातील जनतेला गरज असताना केलेली बदली चुकीची आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition to the transfer of doctors