
या शेतीसाठी त्यांनी आपल्या कातळ जमिनीची निवड केली.
गावतळे (रत्नागिरी) : उन्हवरे (दापोली) हे खरंतर गरम पाण्याचे झरे यासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मात्र, येथील तळवटकरवाडीतील मनोहर तळवटकर यांनी पूर्णतः सेंद्रिय खतांवर आधारित तीन एकरमध्ये विषमुक्त शेती करीत शिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, मटारसह अनेक भाज्यांचे उत्पन्न घेत एक आदर्श निर्माण केला आहे.
या विषमुक्त शेतीसाठी त्यांनी आपल्या कातळ जमिनीची निवड केली. कोल्हापुरातून रोपे आणली, एक किलोमीटरवरून आपल्या विहिरीचे पाणी आणले आणि पाण्याची समस्या दूर केली. रोपांनां पाणी कमी पडू नये, यासाठी त्यांनी ठिंबक सिंचन करून घेतले.
हेही वाचा - पवार यांनी राणेंपासून धोका का ? असे म्हणत मिश्कील टिपण्णी केली
शिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, वांगी, मटार, कोथिंबीर, शंकेश्वरी मिरची, लवंगी मिरची, कलिंगड अशा विविध प्रकारची लागवड केली. उन्हवरे येथे माकडांचा भरपूर त्रास आहे. हाताशी आलेली पिके जाऊ नयेत, यासाठी दिवसरात्र एक करत राखण केली. २० जानेवारीला त्यांनी सिमला मिरची बाजारात आणली देखील.
पुढील काही दिवसांत सर्वच पिके विक्रीसाठी बाजारात आणण्यायोग्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी कोरोना काळात १३ टन कलिंगड, तीन टन भेंडी, एक टन गवार, चवळी शेंग यांचं उत्पन्न घेऊन चांगले पैसे मिळविल्याचे त्यांनी सांगितले.
रोपे झाली तरतरीत
कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता पूर्णतः शेणखतावर शेती उभी केली. पिकांवर अनेक प्रकारचे रोग येतात, त्यासाठी विषारी औषधांची फवारणी बहुतांश लोक करतात. पण, मनोहर तळवटकर यांनी पिकांवर गोमुत्राची फवारणी केली. यामुळे रोपे तरतरीत झाली व फळधारणाचे प्रमाण चांगले राहिले, असे त्यांनी सांगितले. त्यांच्यासह कुटुंबीयांनी भरपूर मेहनत घेतली.
हेही वाचा - राज्य शासनाचा निर्णय डावलून तेथे केंद्र शासनाने हस्तक्षेप करणे ही पद्धत योग्य नाही
"कोकणातील जमिनीवर पश्चिम महाराष्ट्रातील ही पिके होत नाहीत, असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, मला वाटतं, की कोकणातील लाल मातीही गुणी आहे. त्यात काहीही पिकविले तरी चांगले उत्पन्न मिळू शकते; मात्र सेंद्रिय खते वापरली आणि भरपूर मेहनत घेतली तर ही माती भरपूर पैसा देईल."
- मनोहर तळवटकर, शेतकरी
संपादन - स्नेहल कदम