सासूचे दागिने पळवणारा तरुण आचऱ्यात ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 एप्रिल 2019

आचरा - आचरा-पिरावाडी येथे सासूच्या बंद घराचे कुलूप तोडत ट्रंकेत ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम चोरून नेणाऱ्या जावयास येथील पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत तो राहत असलेल्या भाडेतत्त्वावरील खोलीतून त्याला चोरलेल्या ऐवजासह ताब्यात घेतले. 

आचरा - आचरा-पिरावाडी येथे सासूच्या बंद घराचे कुलूप तोडत ट्रंकेत ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम चोरून नेणाऱ्या जावयास येथील पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत तो राहत असलेल्या भाडेतत्त्वावरील खोलीतून त्याला चोरलेल्या ऐवजासह ताब्यात घेतले. 

विशाखा विठ्ठल खवणेकर (वय ५०, रा. आचरा-पिरावाडी) यांनी आचरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, की जावई योगेश महादेव सुतार (३१, मूळ राच, तळोशी, जि. रायगड) मुलगी सायली व तीन मुलांसह पिरावाडी शंकरवाडी येथील घरी राहत होता; पण दारू पिऊन मुलीला मारहाण करू लागल्याने त्याला घरातून बाहेर काढण्यात आले होते.

आपले पिरावाडीला दक्षिणवाडा व शंकरवाडी येथे मिळून दोन घरे आहेत. हनुमान जयंतीसाठी मी १९ एप्रिलपासून दक्षिणवाडा येथील घरात राहायला आले होते. शंकरवाडी येथील घराजवळ माड लागवड केल्याने एक दिवस आड झाडांना पाणी देण्यासाठी जावून येत असे. ता. २५ एप्रिलला सायंकाळी चार वाजता शंकरवाडी येथील नवीन घराजवळील माडांना पाणी घालून आलो. शुक्रवारी (ता. २६) दुपारी दोन वाजता पिरावाडी येथील रिक्षा चालकाने आपल्या जावयाचे पाकीट सापडल्याचे आपल्याला दूरध्वनी करून सांगितले. त्यांच्याकडून ते घेऊन खवणेकर यांनी उघडून बघितले असता त्यात एक फोटो, आधार कार्ड, दोन एटीएम, पॅनकार्ड व पावत्या आढळून आल्या. 

यानंतर शंकरवाडी येथील नवीन घरी जाऊन पाहिले असता घराचे कुलूप फोडून कडीला अडकवलेले आढळून आले. संशय आल्याने आपण घरात जाऊन पाहिले असता घरातील ट्रंकेत ठेवलेले सुमारे ७९ हजारांच्या सोन्याच्या दोन साखळ्या, कर्णफूल, गळ्यातील हार असे दागिने व रोख रक्कम नऊ हजार रुपये मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यांनी फिर्यादीत जावयावर संशय व्यक्‍त केला.

याबाबत आचरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल सुनील चव्हाण, देसाई आदींनी सुतारला देवूळवाडी येथील खोलीची तपासणी करून ऐवजासह ताब्यात घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ornament robbery one youth arrested in Aachra