परराज्यातील १५० नौका परतीच्या प्रवासाला

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

विविध बंदरांत वादळामुळे आश्रयाला; वातावरण निवळले, मच्छीमारांना बसला फटका

रत्नागिरी : समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वातावरणामुळे जिल्ह्यातील विविध बंदरांमध्ये आश्रयाला आलेल्या परराज्यातील सुमारे १५० ते २०० नौका परतीच्या प्रवासाला लागल्या आहेत. सुमारे ७० टक्केच्यावर नौका माघारी फिरल्या आहेत. मत्स्य विभागाने याला दुजोरा दिला. ४० ते ५० टक्के मच्छीमार वातावरण निवळल्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात गेले.

हेही वाचा -  कोकणात घरात सापडली दहा किलो वजनाची घोरपड -

मासेमारी हंगाम मिळावा, यासाठी समुद्रातील वातावरणाचा अंदाज घेऊन मच्छीमार मासेमारीसाठी गेले होते. परंतु समुद्रात अचानक कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्राला पावसाचा मोठा तडाखा बसला. त्यामुळे बुधवार, गुरुवारी वेगवान वाऱ्यासह पाऊस झाला.

समुद्र खवळल्यामुळे गुजरात, मुंबई हर्णैमधील सुमारे १०० ते १५० नौका जयगड, तवसाळ येथील बंदरात आश्रयासाठी आलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली; मात्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती खोल समुद्रात जैसे थे आहे. मात्र आज वातावरण चांगले असल्याने गुजरात, मुंबई येथील मच्छीमार परतीच्या मागे लागल्या आहेत. आतापर्यंत ७० टक्के नौका परतल्या आहे. 

हेही वाचा - कोकणात १७०० हेक्‍टरवरील क्षेत्र बाधित ; एक कोटी १५ लाखांचा फटका -

५० टक्के मच्छीमार समुद्रात 

बदलत्या वातावरणामुळे जिल्ह्यातील मासेमारी सलग चार दिवस ठप्पच होती. त्यामुळे कोट्यवधीचे नुकसान मच्छीमारांना सहन करावे लागले. आज वातावरण निवळल्यामुळे ५० टक्के मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: other state boat return from destination from ratnagiri beach 50 percent fisherman start for fishing