अन्यथा हल्लेखोरांचा आम्ही बंदोबस्त करू - अतुल रावराणे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

वैभववाडी - माजी महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे यांच्या घरावर झालेल्या दगडफेकीचा प्रकार हा सुनियोजित हल्ला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अन्यथा हल्लेखोरांचा आम्ही बंदोबस्त करू, असे भाजपचे युवा नेते अतुल रावराणे यांनी येथे स्पष्ट केले.

वैभववाडी - माजी महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे यांच्या घरावर झालेल्या दगडफेकीचा प्रकार हा सुनियोजित हल्ला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अन्यथा हल्लेखोरांचा आम्ही बंदोबस्त करू, असे भाजपचे युवा नेते अतुल रावराणे यांनी येथे स्पष्ट केले.

माजी महिला बालकल्याण सभापती तथा जिल्हा परिषद सदस्या सौ. चोरगे यांच्या घरावर बुधवारी (ता. १५) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास दगडफेक झाली. यामध्ये त्यांच्या मोटारीचे नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर श्री. रावराणे यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांच्यासोबत प्रमोद रावराणे, स्नेहलता चोरगे, सज्जन रावराणे, हिरा पाटील आदी उपस्थित होते.

श्री. रावराणे म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद सदस्या सौ. चोरगे या कोकिसरे जिल्हा परिषद मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत होत्या. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच त्यांनी भाजपत प्रवेश केला. यामुळे या मतदारसंघात भाजपला चांगले यश मिळाले. याशिवाय पंचायत समितीवर भाजपचा सभापती बसविण्यात आम्हाला यश आले. याचा पोटशूळ आलेल्यांनीच सौ. चोरगे यांच्या घरावर दगडफेक केली आहे. हा दगडफेकीचा प्रकार पूर्वनियोजित आहे. ज्यादिवशी हल्ला झाला त्यादिवशी शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. या हल्ल्याची पोलिसांनी सखोल चौकशी करावी आणि हल्लेखोरांना तातडीने शोधून काढावे, अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने उत्तर द्यावे लागेल.

ज्यांनी महिलांचे संरक्षण केले, त्यांना मान सन्मान दिला त्या शिवछत्रपतीच्या जयंती दिवशीच हा हल्ला करण्यात आला आहे. महिलांवर अशा प्रकारचा हल्ला हे भ्याडपणाचे लक्षण आहे. हा हल्ला राजकीय वैमनस्यातूनच झाला आहे. तालुक्‍यात भाजपला चांगले यश मिळाले हे यश पचनी न पडलेल्यांनीच हे कृत्य केले असावे. पोलिसांनी अशा हल्लेखोरांना शोधून काडून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा हल्लेखोरांचा आम्ही बंदोबस्त करू. जिल्ह्यात यापूर्वी अशा प्रकारचे अनेक गुन्हे घडले आहेत. आता वैभववाडीतील शांतता भंग करण्याचा प्रकार या माध्यमातून सुरू आहे. परंतु वैभववाडीतील जनता अशा प्रकारच्या प्रवृत्तीना थारा देणार नाही. या घटनेचा निषेध करीत आहे.

आम्ही आपल्या दगडाची वाट पाहतोय - रावराणे
ज्यांना दगड मारायचे आहेत त्यांनी महिला लोकप्रतिनिधीच्या घरावर न मारता आमच्यासारख्यांवर मारावेत आम्ही आपल्या दगडाची वाट पाहतोय अशा शब्दात भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे यांनी हल्लेखोरांना आव्हान दिले. भाजप कार्यकर्त्यावरील हल्ले यापुढे अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 

इतिहास तपासून कारवाई करा
यापूर्वी जिल्ह्यात अशा प्रकारचे अनेक गुन्हे घडले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्या सौ. चोरगे यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करताना पोलिसांनी अशा पद्धतीचे गुन्हे ज्यांच्यावर आहेत त्यांची चौकशी करावी, अशी मागणी अतुल रावराणे यांनी केली आहे.

Web Title: Otherwise, we will arrange the perpetrators