खुषखबर ! पाचल ग्रामपंचायतीतर्फे शेतकऱ्यांसाठी 'हे' केंद्र 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

पाचल येथील कृषी मंडल कार्यालयामध्ये सुरू केलेल्या कृषी वाचनालयाचा आरंभ कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील यांच्या उपस्थितीत सरपंच अपेक्षा मासये यांच्या हस्ते झाले.

राजापूर (रत्नागिरी) - शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा आणि जास्त जमीन ओलिताखाली आणण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती वा प्रबोधन करण्यासाठी पाचल ग्रामपंचायतीने कृषी वाचनालय आणि कृषी सल्ला केंद्र सुरू केले आहे. शेतकऱ्यांसाठी वाचनालय सुरू करून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी पाचल पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. 

पाचल येथील कृषी मंडल कार्यालयामध्ये सुरू केलेल्या कृषी वाचनालयाचा आरंभ कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील यांच्या उपस्थितीत सरपंच अपेक्षा मासये यांच्या हस्ते झाले. या वेळी पंचायत समितीच्या सभापती विशाखा लाड, सागर पाटील, किशोर नारकर, विनायक सक्रे, संतोष मदने, आदी उपस्थित होते. सातत्याने बदलते हवामान, लहरी पाऊस, त्यातून मिळणारे कमी उत्पन्न आदींमुळे शेतकऱ्यांचा शेतीकडे बघण्याच्या दृष्टिकोन बदलला आहे.

हेही वाचा - रत्नागिरी जिल्ह्यात होणार कालव्यांचे 250 किमीचे जाळे 

शेती उत्पन्नाचे शाश्‍वत स्रोत असूनही गेल्या काही वर्षामध्ये पडीक शेतीक्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. शेतीकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन व्हावा, या उद्देशाने कृषी वाचनालय सुरू केले आहे. ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कृषी सहसंचालक पाटील यांनी विशेष कौतुक करताना या वाचनालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह लोकांचे प्रबोधन होऊन शेतकऱ्यांची पुन्हा एकदा शेताकडे पावले फिरून शिवार निश्‍चितच गजबजेल असा विश्‍वास व्यक्त केला. 

हेही वाचा - मुंबई गोवा मार्गावर येथे होतोय सर्वात मोठा भुयारी मार्ग 

कृषी सल्ला केंद्र उभारणीही 

कृषीसंबधित लागणारी पुस्तके पाचल ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिली आहेत. त्यामध्ये कृषी विषयक शासनाच्या विविध योजनांसह विविध प्रकारच्या लागवडीसह त्याची निगा कशी राखावी, सिंचन कसे करावे, कमी श्रमातून जादा उत्पन्न कसे मिळवायचे, जादा उत्पन्न मिळवून देणारी पिके कोणती आदी माहिती देणाऱ्या पुस्तकांचा समावेश आहे. कृषी सल्ला केंद्र उभारणीसाठी लागणारी साहित्यसामुग्री, संगणक, प्रिंटर आदी साहित्यही ग्रामपंचायतीने दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pachal Gram Panchayat Help Center For Farmers Ratnagiri Marathi News