‘रेन हार्वेस्टिंग’ करणाऱ्यांना पॅकेज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

पर्यटन प्रकल्प
स्थानिक पर्यटन वाढीसाठी लवकरच शहरात वॅक्‍स म्युझियमबरोबरच मनोरंजनासाठी मिनी थिएटर करण्याचा मानस असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी या वेळी सांगितले.

देवगड - भविष्यात शहराची पाणीटंचाईतून मुक्‍तता होण्यासाठी पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) हाच सक्षम पर्याय आहे. शहरवासीयांनी समजून घेऊन या उपक्रमाला प्रतिसाद दिल्यास चांगला उपाय ठरू शकेल, असे मत आमदार नीतेश राणे यांनी येथे व्यक्‍त केले. आपल्या घरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घेणाऱ्या कुटुंबातील व्यक्‍तींना नगरपंचायतीच्या वतीने भेटपॅकेज देण्याच्या विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले.

नगरविकास दिनानिमित्त येथील देवगड-जामसंडे नगरपंचायततर्फे शेठ म. ग. हायस्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी श्री. राणे बोलत होते. मंचावर नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, उद्योजक प्रकाश गायकवाड, काँग्रेस तालुकाध्यक्ष अमोल तेली, संदीप साटम, प्रकाश राणे, निशिकांत साटम तसेच नगरसेवक उपस्थित होते. या वेळी श्री. राणे यांच्या हस्ते नगरपंचायतीच्या कॅशलेस प्रणालीचे उद्‌घाटन झाले. 

श्री. राणे म्हणाले, ‘‘नगरपंचायतीमधील सत्ता स्थापनेनंतर नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. शहरातील पायाभूत व नागरी सुविधांबरोबरच पाणी हाच केंद्रबिंदू मानून नगरपंचायत काम करणार आहे. शहरवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच अन्य शहरांच्या तुलनेत आपली नगरपंचायत सर्वार्थाने सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न राहतील. निवडणुकीपुरते राजकारण मानून नागरिकांपर्यंत विकास पोचवला जाईल. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार करण्याचा प्रयत्न राहील. शहराचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी निकालात निघण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा चांगला पर्याय ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी याला प्रतिसाद दिला पाहिजे.’’ 

सौ. साळसकर यांनी प्रास्ताविकात, रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबतची सविस्तर माहिती देऊन नागरिकांनी नगरपंचायतीला साथ देण्याचे आवाहन केले. श्री. कंकाळ यांनी, शहरासाठीचा हा प्रयत्न पुढील पिढीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे सांगितले. नील बांदिवडेकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी बी. एस. पोवार आणि मीतेश तळावडेकर यांनी ही मार्गदर्शन केले.

Web Title: Package for Rain Harvesting