कंत्राटी कामगार किरणोत्सर्गाचा धोका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

'बीएआरसी'कडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड

'बीएआरसी'कडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड
पालघर - भारतात अणू आस्थापनेपासून 1.6 किलोमीटर परिसरात कोणतीही लोकवस्ती अपेक्षित नसताना तारापूरच्या भाभा अणुसंशोधन केंद्राने (बीएआरसी) मात्र अणुऊर्जा नियामक मंडळाच्या (ईआरबी) नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, तारापूर अणुऊर्जा केंद्रातील अणुभट्टीची देखभाल व दुरुस्ती सुरू असताना परिसरातच (एक्‍स्लुझिव्ह झोन) राहणाऱ्या सुमारे एक हजार कंत्राटी कामगारांना किरणोत्सर्गाच्या संसर्गापासून धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

"बीएआरसी'मध्ये दोन वर्षांपासून इन्टिग्रेटेड न्यूक्‍लिअर रिसायकल प्रोजेक्‍टरची (आयएनआरपी) उभारणी सुरू आहे. हिंदुस्थान कन्स्ट्रक्‍शन कंपनीतर्फे या प्रकल्प उभारणीचे काम होत आहे. या कामाची अनेक उपकंत्राटे देण्यात आली आहेत. त्यापैकी बांधकाम व इतर कामांचे हजारो कंत्राटी कामगार "आयएनआरपी'च्या परिसरातच राहत असल्याचे उघडकीस आले आहे. या कंत्राटी कामगारांसाठी अणुऊर्जा केंद्राच्या 1.6 किलोमीटर परिसरातच मध्यवर्ती स्वयंपाकघर आहे. प्रकल्पातच या कामगारांची दिनचर्या सुरू असते. कंत्राटांमधील काही स्थानिक कामगार मात्र दररोज आपल्या घरून ये जा करतात.

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प तीन व चारच्या उभारणीवेळी बांधकामासाठी असलेले कंत्राटी कामगार केंद्रांपासून 1.6 किलोमीटरपेक्षा दूर पत्रा कॉलनीत राहतात. मात्र, बीएआरसीच्या नव्या प्रकल्प उभारणीसाठी असलेले कंत्राटी कामगार "एक्‍स्लुझिव्ह झोन'मध्येच राहत असल्याचे एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले.

यासंदर्भात तारापूर प्रकल्पातील अधिकाऱ्यांसह बीएआरसीचे जनसंपर्क अधिकारी आर. के. सिंह यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

Web Title: palghar konkan news Contract Labor Risk Radiation