उद्धर येथे आढळले दुर्मिळ 'ऍटलास मॉथ'

अमित गवळे
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

पश्‍चिम घाटात हे पतंग दिसतात. हा पर्यावरणातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. नरापेक्षा मादी मोठी असते. नराला जास्त आच्छादन असलेला "अँटेना' असतो, तर मादीला पातळ आच्छादन असलेला "अँटेना' असतो. मादी फेरोमोन्स नावाचे एक द्रव्य हवेत सोडते आणि नराला प्रणयासाठी आकर्षित करते. नराला काही किलोमीटरवरून सुद्धा फेरोमोन्सचा गंध येतो. उण्यापुऱ्या पाच ते सात दिवसांच्या आयुष्यात हे पतंग आपला वारसा ठेवून जातात.
- रामेश्वर मुंढे, पर्यावरण अभ्यासक

जगातील सर्वांत मोठ्या पतंगांपैकी एक
पाली - जगातील सर्वांत मोठ्या पतंगांपैकी एक असलेले "ऍटलास मॉथ' उद्धर (ता. सुधागड) येथे आढळले. तुषार केळकर यांच्या घरासमोरील झाडावर हा पतंग काही काळ विसावला होता.

"ऍटलास मॉथ'चा रंग बदामी- तपकिरी व किंचित लालसर असतो. पंखावर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात, त्यामुळेच त्याला "ऍटलास पतंग' म्हणतात. याच्या पंखांची लांबी साधारणपणे 11 ते 12 इंच (25 सें.मी.) असते. याचे वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते. सुरवंट अवस्थेतच त्याने भरपूर खाऊन घेतलेले असते. या पतंगाचे आयुष्य जेमतेम पाच ते सात दिवसांचे असल्याने तोंड आणि पचनसंस्थेची गरज भासत नाही. या अल्प कालावधीतच प्रणय करून आपला वारसा (अंडी घालून) मागे ठेवून हे पतंग मरतात.

अशा नैसर्गिक आश्‍चर्याने भरलेला हा जीव प्रामुख्याने दक्षिण- पूर्व आशियात आढळतो. महाराष्ट्रात भीमाशंकर आणि बोरिवली राष्ट्रीय उद्यान; तसेच इतर काही जंगलांमध्ये "ऍटलास मॉथ' सापडतो.

जीवनप्रवास
हा पतंग दालचिनी, लिंबू, जांभूळ, पेरू व लिंबूवर्गीय झाडांवरच आढळतो. तिथेच त्याच्या प्रणय व अंडी घालणे या क्रिया होतात. मादी एका वेळेस 100 ते 200 अंडी घालते. अंडी दहा ते चौदा दिवसांत उबवून त्यातून सुरवंट (अळी) बाहेर येते. हे सुरवंट 35 ते 40 दिवस सतत झाडांची पाने खातच राहतात. त्यानंतर त्यांचे कोशात रूपांतर होते. एकवीस दिवसांनंतर कोशातून पतंग बाहेर येतो. हा पतंग अवघा आठवडाभर जगतो. यादरम्यान प्रणय करून अंडी घालणे हा त्याचा शेवटचा कार्यभाग असतो.

फोटो-सी11915
ऍटलास मॉथ

Web Title: pali konkan news atlas moth in uddhar